‘अनाघ्रात’ ने पटकावला प्रथम क्रमांक

सोलापूर , ७ जुलै २०२० : रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या कै.किरण साळवी स्मरणार्थ, प्र.ल मयेकर स्मृती नाट्यलेखन स्पर्धा २०२० चा निकाल जाहीर झाला असून कुर्डुवाडी येथील विनय दहिवाळ लिखित ‘अनाघ्रात’ या संहितेस प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. रत्नागिरी स्थित “श्रीरंग” या संस्थेने स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या नाट्यस्पर्धेसाठी ४६ लेखकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विनय दहिवाळ यांच्या अनाघ्रात या संहितेस प्रथम पुरस्कार मिळाला. शिवाय केदार देसाई, कुडाळ यांच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ संहितेस द्वितीय व माधव जोगळेकर, पुणे यांच्या ‘मरे एक त्याचा ‘ या संहितेने तृतीय क्रमांक पटकावला.

याचबरोबर इरफान मुजावर यांच्या ‘पूर्णविराम’ या संहितेला पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आणि संजय रणदिवे यांच्या ‘कालपुरुष’ या संहितेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पुण्याचे नाट्यलेखक डॉ समीर मोने यांनी या स्पर्धेसाठी आलेल्या संहितेच्या परीक्षणाचे काम पाहिले होते.

विनय दहिवाळ हे रंगमचावर काम करणारे कलाकार आहेत. आजवर अनेक नाटकांमधून विविध व्यक्तिरेखा त्यांनी सादर केल्या आहेत .त्याचबरोबर त्यांनी सामाजिक विषय व समस्या अधोरेखीत करणारी विविध नाटके लिहिली आहेत. त्यांना यापूर्वीही ‘कुसुमाग्रज करंडक’ या नाट्य लेखन स्पर्धेमध्ये ही ‘अनाघ्रात’ या संहितेसाठी प्रथम क्रमांक मिळाला होता. शिवाय, ला. कृ. आयरे ट्रस्ट लांजा आयोजित नाट्यलेखन स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या “मॉलिस स्कुपम” या संहितेसाठी तृतीय क्रमांक मिळाला होता.

गोवा कला अकादमीच्या नाट्य स्पर्धेमध्ये सादरीकरणा करिता वैयक्तिक सहा बक्षिसांसह अनाघ्रात ला देखील प्रथम परितोषकाने गौरवण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नाट्य स्पर्धेत ‘ मॉलिस स्कुपम’ ला सादरीकरणा करिता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा