‘आनंदाचा शिधा’ गायब, दिवाळीत गरीबांच्या ताटात ज्वारीची भाकर!

यंदाच्या दिवाळीत राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम बंद केल्याने पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४ लाख ८९ हजारांहून अधिक गरीब शिधापत्रिकाधारकांना मोठा धक्का बसला आहे. दिवाळीच्या तोंडावर ‘आनंदाचा शिधा’ न मिळाल्याने लाभार्थ्यांना सणांसाठी मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे.

एकीकडे आनंदाचा शिधा बंद, तर दुसरीकडे रेशनवर गहू आणि तांदळाच्या प्रमाणात कपात करून ज्वारीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ऐन दिवाळीत गरीब कुटुंबांच्या ताटात भाकरी खाण्याची वेळ आली आहे. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना यापूर्वी प्रत्येकी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ मिळत होता, पण आता नोव्हेंबरपासून पुढील दोन महिन्यांसाठी प्रत्येकी १ किलो गहू, १ किलो ज्वारी आणि ३ किलो तांदूळ असे वाटप केले जाणार आहे.

पुरवठा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या निर्णयानुसार नोव्हेंबरपासून शिधापत्रिकाधारकांना दोन महिन्यांसाठी ज्वारीचे वाटप सुरू होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ४,८९,३८७ लाभार्थ्यांमध्ये अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिका धारकांचा समावेश आहे.

“गेल्या वर्षी आनंदाचा शिधा मिळाल्याने दिवाळी आनंदात गेली होती; मात्र यंदा तो न मिळाल्यामुळे दिवाळीला अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे,” अशी खंत देहूरोड येथील लाभार्थी ताई गरुड यांनी व्यक्त केली.

आर्थिक अडचणींमुळे ही योजना थांबवल्याचे कारण सरकारने दिले आहे. यामुळे दिवाळीसह इतर सणांदरम्यान गरिबांना मिळणारा हा महत्त्वाचा आधार यंदा हिरावून घेण्यात आला आहे, अशी तीव्र नाराजी लाभार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे