भारताचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या आणि विद्येच्या माहेर घरात म्हणजेच पुणे शहरात जन्मलेल्या आनंदीबाई जोशी यांना भारतातील पहिली डॉक्टर अशी ओळख असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचा आज जन्मदिवस. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे आज महिलांना या क्षेत्रात मानाचे स्थान आहे.
ज्या काळात महिलांनी शिक्षण घेणेही अशक्यप्राय गोष्ट मानली जायची. त्या काळात विदेशात जाऊन त्यांनी डॉक्टरी डिग्री मिळविणे हे खरंच गौरवास्पदच आहे.
आनंदीबाईंचा विवाह बालवयातच म्हणजे त्या नऊ वर्षांच्या असताना झाला. त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असणार्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. निव्वळ चौदा वर्ष वय असताना आई बनणार्या आनंदीबाईंना केवळ दहा दिवसातच आपल्या बाळाचा मृत्यू पाहिल्याने फार मोठा धक्का बसला.
आपले मूल गमावल्यानंतर त्यांनी डॉक्टर बनून अशा प्रकारे अकाली होणारे मृत्यू थांबविण्याचा प्रयत्न करायचा असा पण केला. या कार्यात त्यांना पती गोपाळरावांचे साहाय्य मिळाले. ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनीच आनंदीबाईंना प्रोत्साहन दिले.
आनंदीबाई जोशींचे व्यक्तित्व महिलांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी इ.स. १८८६ मध्ये आपले डॉक्टर बनण्याचे स्वप्न त्यांनी साकार केले.
एका विवाहित स्त्रीने विदेशात जाऊन शिक्षण घ्यावे. याबद्दल टीकाकारांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. परंतु टीकाकारांची पर्वा न करता त्यांनी पहिली महिला डॉक्टर होण्याचा गौरव मिळवला.
डिग्री मिळविल्यानंतर आनंदीबाई भारतात परतल्या. मात्र त्यांचे आरोग्य खालावयास सुरुवात झाली. आणि अल्पवयातच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अगदी खडतर परिस्थितीवर मात करीत पतीच्या मार्गदर्शनाने आणि साथीने आनंदीबाईंनी भारताची पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला.
त्यांच्या लहानग्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य म्हणजे प्रत्येक भारतीय स्त्री साठी आदर्श आहे. आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा “आनंदी गोपाळ” हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झाला.