शिवाजी महाराजांचे पूर्वज

नमस्कार मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या पूर्वजांची माहिती तुम्हाला शहाजी राजे आणि मालोजी राजे इथपर्यंत माहीत असेल; परंतु त्या आधीचा इतिहास फारसा तुम्हाला परिचित नसेल. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापना करण्यापूर्वी त्यास अनुकूल असे वातावरण महाराष्ट्रात कसे तयार होत गेले, तसेच प्रामुख्याने पाच शाह्या उदय पावल्या त्या विषयी ही या लेखात जाणून घेऊया. या शाह्या उदयास येण्या आधी महाराष्ट्राची घडामोड कशी झाली याचा देखील आढावा यात आपण घेणार आहोत. लेख मोठा झाला आहे त्यामुळे शहाजी राजेंची माहिती मी इथे दिली नाही. शहाजी राजांविषयी माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये सांगा मी माहिती संकलित करून उपलब्ध करून देईल.

शिवाजी महाराजांचा जन्म भोसले कूळात झाला. या घराण्याचा मूळ पुरुष सुजनसिंह हा उदयपूरच्या शिसोदे राजघराण्यातील असून तो इ. स. १३३४ च्या सुमारास आपले भाग्य अजमाविण्यासाठी उत्तरेतून दक्षिणेत उतरला व बहामनी घराण्याचा मूळ पुरुष हसनगंगू याच्या पदरी त्याने चाकरी पत्करली. हसनगंगूचा पाडाव करण्यासाठी बादशहा महंमद तुघलक याने दिल्लीहून इ. स. १३४६ मध्ये दक्षिणेत स्वारी केली. त्या दोघांमध्ये झालेल्या संग्रामात सुजनसिंह व त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी मोठा पराक्रम केला. इ. स. १३४७ मध्ये हसनगंगूने अल्लाउद्दीन बहमन हे नाव धारण करून गुलबर्गा बहामनी राज्याची स्थापना केली. तेव्हा त्यांनी सुजनसिंहास देवगिरी प्रांतातील १० गावे जहागीर देऊन मोठी सरदारी दिली. पुढे बहामनी राज्यात सुजनसिंहाचे कुटुंबाचा उत्कर्ष होत गेला. सुजनसिंह इ. स. १३५५ मध्ये मरण पावला. त्याचा पुत्र दिलीपसिंग कुटुंबप्रमुख बनला. दिलिपसिंहाचा पुत्र सिद्धजी हा कर्तबगार होता. त्याने बहामनी सत्तेच्या रक्षणार्थ प्राण खची घातले. त्यांचा पुत्र भेरवसिंह ऊर्फ भोसाजी यांच्या पिढीपासून या घराण्यांत ” भोसले” हे उपनाव रूढ झाले. भोसाजीचे वंशज ते भोसले. राणाकर्णसिंह आणि शुभकृष्णसिंह हे भोसाजीचे पणतू.

सन १४६९ साली बहामनी वजीर महंमद गवान याने दक्षिण कोकण जिंकण्यासाठी लष्करी मोहीम हाती घेतली. कर्णसिंह आपल्या भीमसिंह या पुत्रासह या मोहिमेत सहभागी झाला होता. कोकणात उतरत असताना मार्गात खेळणा ऊर्फ विशालगड हा किल्ला लागला. तो घेण्यासाठी बहामनी फौजा प्रयत्नांची शर्थ करू लागल्या. पण सह्याद्री पर्वताच्या बिकट रांगेतील हा दर्गम किल्ला सहजासहजी हल्ला करून जिंकता येण्यासारखा नव्हता. बहामनी फोजेचे सर्व प्रयत्न संपल्यावर कर्णसिंह व भीमसिंह या पितापुत्रांनी एक अभिनव यक्ती लढविली. त्यांनी घोरपडीच्या साहाय्याने कडा चढून किल्ला हस्तगत केला. किल्ल्यावरील लढाईत राणा कर्णसिंह धारातीर्थी पडला. पण त्याच्या प्रयत्नाने दक्षिण कोकणाचे प्रवेशद्वार असलेला खेळणा किल्ला जिंकला गेला. म्हणून बहामनी सुलतानाने कर्णसिंह व भीमसिंह यांचा गौरव करून भीमसिंहास “राजा घोरपडे बहाद्दर” हा किताब व मुधोळ आणि त्यांच्या जवळची ८४ गावे जहागीर म्हणून दिली.

(सन १४६९) त्या वेळेपासन भोसले वंश शाखेस घोरपडे हे नाव प्राप्त झाले. मुसलमानी सत्ता महाराष्ट्रात स्थिर झाल्यावर खिलजी, तुघलक, बहामनी यांच्या कारकीर्दीत हजारो मुसलमान दक्षिणेत आले. त्यात सुफी कलंदर, पीर, फकीर होते. राजाश्रयाच्या जोरांवर सुफीनी ठिकठिकाणी मठ, दर्ग, मशिदी यांची स्थापना केली. त्या काळात दाभोळ, चोलला उतरणान्या प्रत्येक जहाजाबरोबर इराकी, इराणी, अरब आणि हबशी, मुत्सद्दी आणि औलिया दक्षिणेत उतरत. दिल्लीहुन अशीच वर्दळ दक्षिणेत चालू होती. बहामनी सुलतानांनी इराण (पशिया), तुर्कस्थान, मध्य आशिया, अरबस्थान आणि अफगाणिस्थानातील मुसलमानांना आपल्या नोकरीत ठेवले होते. परिणामी दख्खनी व परदेशी यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला. शिवाय बहुतेक दख्खनी सुन्नी पंथाचे असून बहुतेक परदेशी शिया पंथीय होते.

बहामनी राज्याचा एक गाजलेला प्रधानमंत्री महंमद गवान हा इराणी होता. त्याचाही खुन या संघर्षात पडला. बहामनी काळात अधिकाराच्या जागेवर एकाही हिंदूचे नाव आढळत नाही असे फारशीचे विद्वान इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी सांगतात. ह्या काळात राज्यकर्त्या मुस्लिम समाजाकडून हिंदूचा छळ होत होता. याचे मोठे भेदक चित्र शिवचरित्र साहित्यात प्रसिद्ध झालेल्या लेखात सापडते. ते राजवाड्यांनी रेखाटले आहे. ते लिहितात, ” हिंदू बाटवले गेले, देवळे मोडली गेली, देव फोडले गेले, बायका भ्रष्ट केल्या गेल्या, साधुसंत छळले गेले. देवळांच्या मशिदी झाल्या, पर्वत्यांचे पीर झाले, घाटाचे दर्गे बनले, राऊळाचे महल झाले. धर्म केवळ लोपून गेला अशी हैराण गत झाली”. परकी राज्यसत्तेचा दुसरा परिणाम म्हणजे राज्यकत्यांची दखनची हिंदी भाषा, पेहराव, चालीरीती, यांचा उर्दूफारशी लोकांवरील पगडा होय. इजार, चढाव, दाढी, गोवापाडा आणि बोली यांचा अधिकाअधिक शिरकाव हिंदूच्या दैनंदिन राहणीत होत गेला. बहामनी काळात सुफी साधूंनी नाथपंथाला निष्प्रभ केले. पुढील मुस्लिम काळात महानुभाव पंथांची वाताहात झाली. नामदेवाच्या पश्चात वारकरी पंथालाही उतरती कळा लागली.

चौदाव्या शतकातील ज्ञानेश्वर, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत इत्यादींच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या भ्रांत मनाला स्थिरता प्राप्त झाली. पंधराव्या शतकांत गुरुचरित्र, सोळाव्या शतकांत एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे ग्रंथ महत्त्व पावले. कोकणपट्टीतील पोर्तुगीजांच्या उच्छादामुळे नवीन संकटाची भर पडली. तरीही शाह्यांच्या आपआपसातील लढाया, त्यांच्या दरबारी दक्षिणी, परदेशी शिया व सुन्नी या भेदांनी सत्ता स्पर्धेत भर घातली. त्यामुळे मराठा सरदारांना व मुत्सद्यांना डोके वर काढण्यास चांगली संधी मिळाली. मोरे, मोहिते, घोरपडे, घाटगे, जाधव, भोसले अशी अनेक मराठा घराणी पुढे आली. बहामनी राज्य अस्तास गेल्यावर त्याच्या जागी पाच शाह्या उदय पावल्या त्या अशा :

(१) विदर्भाची इमादशाही (१४८४-१५७४) : संस्थापक फतेउल्ला इमादशहा, विदर्भ या बहामनी राज्यातून फुटून आपले स्वातंत्र्य घोषित करणारा पहिला प्रदेश होय. इमादशहा हा मुळचा कनाटकातील ब्राह्मण असून त्याने इस्लाम धर्माची दीक्षा घेतली होती. सन १५७४ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीने इमादशाही राज्य जिंकून विलीन केले.’

(२) विजापूरची आदिलशाही (१४८९-१६८६) : संस्थापक युसुफ आदिलशहा हा महमूद गवानचा जॉर्जीअन गलाम असून स्वकर्तृत्वाने उच्च पदास चढला. हा तुर्कस्थानातून आला होता.

(३) अहमदनगरची निजामशाही (१४९०-१६३६) : संस्थापक मलीक अहमद हा दख्खनी मुसलमान असून मुळचा हिंदू होता. त्याने इ. स. १४९० मध्ये जुन्नर येथे राज्य स्थापिले. सन १४९४ मध्ये त्याने संरक्षणदृष्ट्या योग्य म्हणून जुन्नरहून अहमदनगर (मूळ नाव अंबानगर) येथे आपली राजधानी नेली.’

(४) गोवळकोंड्याची कुतुबशाही (१५१२ ते १६८७) : संस्थापक कुली कुतुबशहा हा इराणी असून शिया पंथाचा होता..

(५) बिदारची बरीदशाही (१५२७-१६१९) : संस्थापक अमीरअली बरीद हा जॉर्जियन होता. स. १६१९ मध्ये आदिलशाहाने बिदर जिंकले.

अहमद निजामशहाचा मुलगा बुन्हाणशहा इ. स. १५७८ मध्ये गादीवर बसला. त्याचा मुख्य प्रधान कंवरसेन हा ब्राह्मण गृहस्थ होता. त्यामुळे हिंदूना शासकीय सेवेत येण्यास सुलभ झाले. शुभकृष्णाचे वंशज बाबाजी भोसले यांनी निजामशाहीची नोकरी पत्करली. त्यास निजामशाहीकडून परगणे पांडे पेडगांवची जहागिरी मिळाली होती. बाबाजींस मालोजी व विठोजी असे दोन पुत्र होते.

मालोजी राजे :

मालोजी राजे इ. स. १५७०-७१ च्या सुमारास जन्मले. मालोजींची पत्नी उमाबाई फलटणच्या निंबाळकरांची मुलगी. मालोजी वयात आल्यावर त्यांनी लष्करी कवाईतीचे शिक्षण वडिलांकडून व सासऱ्याकडून घेतले. यावेळी नगरात निजाम मूर्तजा निजामशहा राज्य करीत होता. त्याने मालोजीस आपल्याकडे घेऊन शिलेदारी दिली. “राजा” ही पदवी, पंचहजारी मनसब व सैन्याच्या खर्चासाठी पुणे, सपे, चाकण चौन्यांशी व इंदापूरची देशमुखी व कुटुंब ठेवण्यासाठी शिवनेरीचा किल्ला इ. स. १५९० च्या सुमारास बहुमानपूर्वक दिला. विजापूर सरदार दिलेरखान याने निजामशहाच्या ताब्यातील किल्ल्यांवर चाल केली. त्याप्रसंगी मालोजीने दिलेरखानास मागे हटवून निजामशाहीचे रक्षण केले. मालोजीच्या या पराक्रमाचा उल्लेख बृहहीश्वर शिलालेखात केलेला आहे.

इ. स. १५९३ मध्ये मालोजीना भूमिगत धन सापडले. त्यामुळे त्यांनी आपली जागा वाढविली, वेरूळच्या घश्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि शिखर शिंगणापूर डोंगराचे पायथ्याशी एक तलाव बांधला. पिण्याच्या पाण्याची सोय केली व रयतेचा दवा घेतला. अशा प्रकारे लोकहिताची अनेक कामे मालोजीनी केली त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. मूर्तजा निजामशहा अल्पवयीन असल्याने दरबारात मलिक अंबर व मिआन राजू यांचे प्रस्थ वाढले व त्यांच्यामध्ये झगडा निर्माण झाला. इ. स. १६०६ च्या अखेरीस मिआन राजूने बंड केले. त्याचा बिमोड करीत असता इंदापूरच्या लढाईत मालोजीना मृत्यू आला. असे शिवभारत सांगतो. त्यानंतर विठोजीचा मृत्यू इ. स. १६१२ च्या सुमारास झाला असावा. आपल्या आयुष्यात मालोजीनी पुणे, सुपे, चाकण, इंदापूर येथील देशमुखी मिळवली. आपल्या पराक्रमाने दौलत संपादन करून भोसले वंशाच्या भाग्योदयाची ध्वजा त्यांनी उभारली. मालोजीची मदत मलिक अंबरास विशेषत्वाने झाली. मालोजी राजे नंतर शहाजी राजे यांनी स्वराज्याचा पाया घालण्यास सुरावत केली. आणि तेच काम शिवाजी महाराजांनी पूर्णत्वास न्हेले.

सदर माहिती डॉ. वी. गो. खोबरेकर यांच्या मराठा कालखंड भाग १ मधून घेतली आहे.

संदर्भ घटना क्रमानुसर दिले आहेत:

१. नीळकंठ शास्त्री, हिस्टरी ऑफ साऊथ इंडिया, पृ. २२५-२२७.
२. ब्रिग्ज फेरिस्ता भा. २, पृ. १७९.
३. बेंद्रे, मालोजी राजे आणि शहाजी महाराज, पृ. ३३.
४. मुधोळ घोरपडे घराण्याचा इतिहास पृ. १३-१८.
रालय
५. राजवाडे ले. सं. भा. ३, पृ. १०१.
६. फेरिस्ता भा. २, पृ. २७१-२७२.
७. ब्रिग्ज फेरिस्ता भा. २. पृ. ९.
८. कुंटे, अहमदनगरची निजामशाही, पृ. २४-२५
९. फेरिस्ता भा. २, पृ. २७४.
१०. बेंद्रे, मालोजी राजे आणि शहाजी महाराज, पृ. १०६.
११. कित्ता, प. १२५-२२६.
१२. शिवभारत अध्याय २, श्लोक २-५.
१३. कित्ता अध्याय ३, श्लोक १-२.

ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा