नवी दिल्ली, 5 उलै 2022: नोएडा येथील स्थानिक पोलिसांनी आज एका न्यूज अँकरला ताब्यात घेतलं आहे. राहुल गांधींचं वक्तव्य चुकीच्या संदर्भात टीव्हीवर प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या मुद्द्यावर अँकरने आपली चूक लक्षात घेऊन आधीच माफी मागितली आहे. उदयपूरमधील टेलरच्या हत्येशी संबंधित घटनेला वायनाडच्या मुद्द्यावर राहुल गांधींचं वक्तव्य अँकरने जोडलं होतं. यावरून झालेल्या वादानंतर त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या होत्या.
सोमवारी सकाळी छत्तीसगडचे पोलीस अँकरला अटक करण्यासाठी त्याच्या गाझियाबाद येथील घरी पोहोचले. यावर अँकरने यूपी पोलिसांची मदत मागितली. त्यानंतर नोएडा पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि अँकरला ताब्यात घेऊन त्यांच्यासोबत गेले. यादरम्यान यूपी पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. छत्तीसगड पोलीस त्याला अटक करू शकत नाहीत म्हणून यूपी पोलिसांनी अँकरला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये टीव्ही अँकरवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजस्थानमध्ये काँग्रेस नेते राम सिंह यांनी बनपार्क पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 504 (हेतूपूर्वक अपमान), 505 (गुन्हेगारी धमकी), 153A (धर्म, जात, स्थानाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणं ), 295A (जाणूनबुजून गुन्हा घडवणं ), दुर्भावनापूर्ण कृत्ये, ज्याचा हेतू कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक विश्वासांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याचा आहे) आणि 120B (गुन्हेगारी कट) या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
अँकरने आपल्या शोमध्ये राहुल गांधींची व्हिडिओ क्लिप लावली. वायनाड (केरळ) येथील त्यांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांना राहुल गांधींनी जे विधान केलं ते उदयपूरमधील टेलरच्या मारेकऱ्यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. हल्लेखोर मुले आहेत, त्यांना माफ केले पाहिजे, असं राहुल म्हणाले होते. राहुल गांधी म्हणाले होते की ज्या मुलांनी हे केलं (वायनाडमध्ये त्यांचं कार्यालय फोडलं), त्यांना माफ केलं पाहिजे. पण टीव्ही शोमध्ये असं सांगण्यात आलं की, ज्यांनी उदयपूरमध्ये कन्हैया लालची हत्या केली त्यांना राहुल माफ करण्यास सांगत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे