अयोध्येतील प्राचीन श्रीराम मंदिर २ हजार वर्षापूर्वीचे : अभिनेते राहुल सोलापूरकर

जळगाव, २२ फेब्रुवारी २०२३ : अयोध्येत पुनर्स्थापित झालेले प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे सुमारे २ हजार वर्षापूर्वीचे होते. या मंदिरावर अनेकांनी हल्ले केलेत. परंतु तत्कालिन हिंदू राज्यकर्त्यांनी ते निकराने लढून परतवून लावले. यात लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. परंतु दगाबाजीमुळे व युध्दनीतीच्या चुकीच्या वापरामुळे हिंदू राजांना पराभव पत्करावा लागला. असे असले तरी साधुसंत, महंत व हिंदूजणांनी ही संस्कृती मनात तेवत ठेवत शांततेच्या मार्गाने, न्यायाच्या मार्गाने लढा देत आजचे भव्य दिव्य असे श्रीराम मंदिर उभे राहिले असल्याची माहिती नामवंत अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर यांनी दिली.

विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे काल सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात शिवजयंतीनिमित्त ‌‘श्रीराम मंदिर अयोध्या : इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील-जाधव, आकाशवाणी जळगाव केंद्राचे निवृत्त उद्घोषक सतीश पप्पू उपस्थित होते. प्रास्ताविक विजया केसरीचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन ऋतुजा संत यांनी केले.

‘श्रीराम मंदिर अयोध्या : इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर पुढे बोलताना अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले की, ५०० वर्षाच्या लढ्यानंतर अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली असली तरी तो इतिहास अपूर्ण आहे. ज्या ठिकाणी राम मंदिर उभारले गेले त्याच ठिकाणी सुमारे २ हजार वर्षापूर्वी राम पुत्र कुशाने या मंदिराची उभारणी केली होती. विविध आक्रमणांमुळे हे मंदिर उद्ध्वस्त झाले होते. त्याची पुनर्उभारणी करण्यात आली. आज जो इतिहास सांगण्यात येत आहे तो ५०० वर्षापासून म्हणजे बाबराचा सेनापती मीर बाकी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले तेव्हापासूनचा इतिहास आपण पाहत आहोत. पण त्याआधीचा इतिहासही जाणून घेणे गरजेचे आहे.

राम पुत्र कुशाने हे मंदिर उभारले त्यानंतर यावर खूप आक्रमणे झालीत. ती त्या-त्या वेळी पतरवून लावली गेली. मीर बाकीने तोडलेल्या मंदिरानंतर मात्र याकडे दुर्लक्ष झाले. १९८३ मध्ये विश्व हिंदू परिषदेने याबाबत ठराव करून संघर्ष सुरू केला. त्यानंतर आज हे राम मंदिर अस्तित्वात आले.

रामायण व महाभारत हे घडलेच नाही, असाही दावा होत असला तरी त्यांचे पुरावे आहे. श्वाककुल वंशीय दशरथ हे ६५ वे वंशज होते, तर ६६ वे वंशज राम होते. हे सर्व आपल्यापर्यंत पोहचले ते महर्षि वाल्मिकींमुळे. वाल्मिकी हे नाव सुध्दा बदलून पुढे आलेले आहे. मूळ नाव आहे रत्नाकर घिवर. जो मासेमारी करायचा. पण कुसंगतीने तो चोर बनला. त्याला नारदमुनींनी वाल्मिकी ऋषी कसे केले हे माहीत आहे. नारदांनी त्याला रामाचा जप करण्यास सांगितले. त्याने तो जप केला. त्याच्याभोवती वारूळ उभे राहिले. नारदांनी ते वारूळ खोदले तर त्यात हे रत्नाकर निघाला. नारदांना त्याने काव्य लिहिण्याचे विचारले, तर नारदांनी त्याला रामाच्या आयुष्यातील घडलेल्या कथा सांगितल्या. त्यावर त्याने रामायण लिहिले, अशी माहिती सोलापूरकरांनी सांगितली.

हिंदूची अस्मिता निर्माण करणारे हे राम मंदिर आहे. वेगवेगळ्या पंथांनी मिळून या मंदिरासाठी लढा दिला आहे. म्हणून त्याचे महत्व आहे. लंकाकांड, ब्रम्हांडपुराण याचे दाखले देत ते सांगतात की, लंका जिंकल्यानंतर लंकेचे राजे ते होऊ शकले असते पण ज्या भूमीत जन्म झाला ती मला स्वर्गासारखी असल्याचे रामांनी लक्ष्मणाला सांगीतले. अयोध्या म्हणजे युध्द करूनही जिंकता न येणारी ती अ योध्या. कुशानंतर ऋषभदेवांनी या मंदिराची पुन्हा उभारणी केली. जैन साहित्य, बौध्द साहित्य यांचे दाखले देत ते म्हणाले की ज्या ठिकाणी मंदिर आहे तेथे ७६ फुट खाली खोल खोदल्यानंतर जुन्या मंदिराचे ५४ खांबांचे अवषेश सापडले आहेत. त्यांची कार्बन चाचणी केली असता ते विक्रमादित्य राजाने बांधल्याचे समजते.

त्रेतायुगापासून यावर हल्ले होत गेले. ख्रिस्तीपूर्व काळापासून हे हल्ले होत आहेत. पहिला हल्ला ग्रिकांनी केला. धार्मिक स्थळे पाडली म्हणजे लोकांमध्ये भीती निमार्ण होते आणि त्यांच्यावर राज्य करता येते. यासाठी सर्वप्रथम धार्मिक स्थळांवर हल्ले झाले.

या मंदिरावर आतापर्यंत १६ हल्ले केल्याचे पुरावे विविध साहित्यात सापडतात. इ.स.पूर्व ७१० पासून हे हल्ले होत १५२६ पर्यंत झालेत. यासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेवटचा राजा देवीदिन पांडे याला मीर बाकीने कपटाने ठार करून हे मंदिर तोडले. तेथे घुमट उभारून तेथे मशीद तयार केली. परंतु त्याभोवती मिनार नसल्याने त्यास मशिद म्हणता येत नाही. मिर बाकीने मिनार उभारलले पण रात्रीतून ते नष्ट होत. शेवटी त्याने कंटाळून हिंदू साधूसंताशी समजोता करायचे ठरवले. पण त्याचा हेतू साध्य झाला नाही. नंतर बाबर आणि मीर बाकी यांचे निधन झाले. त्यानंतर आतापर्यंतचा इतिहास समोर असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीराम मंदिराच्या पूर्वेतिहासाबाबत ऐकण्यासाठी सभागृहात वय वर्ष १० पासून तर वयाची ७० उलटलेले ज्येष्ठ नागरिकही व्याख्यानासाठी उपस्थित होते.

सोलापूरकरांच्या व्याख्यानानंतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या आठ महिलांचा सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात डॉ. सई नेमाडे, स्नेहा सोनवणे, शैला चौधरी, वंदना पाटील, रेखा कुलकर्णी, विद्या वर्मा व अपूर्वा वाणी यांचा सन्मान करण्यात आला.

राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. यातील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात पहिला क्रमांक जानव्ही जगताप, दुसरा क्रमांक अशोक सोनवणे, तिसरा क्रमांक प्रशांत सोनवणे यांचा आला असून त्यांचा गौरवही करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा