मुंबई, ३ डिसेंबर २०२२ : ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शनिवारी सकाळी शुभारंभ होत आहे. या कार्यक्रमाला शिंदे आणि आव्हाड पुन्हा एका व्यासपीठावर असणार आहेत; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्विट करत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. या कार्यक्रमात गेल्यास आता पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गेल्या महिन्यात भाजपा महिला मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ नुसार मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापले होते. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केले आहे.

  • आव्हाड यांचे ट्विट:

ब्रिजच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांपासून ८ फूट अंतरावर असताना आपल्यावर ३५४ चा गुन्हा दाखल झाला होता. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकिट मारल्याचा गुन्हा दाखल करतील अशी भीती व्यक्त करताना चलो ये वक्त भी गुजर जयेगा…, असे जितेंद्र आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

तर अजून एका ट्विटमध्ये… त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील, तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही… तुला कसं कळत नाही… खरंच कळत नाही…, अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा