पुण्यात आंदेकर टोळीवर धडक कारवाई; टपऱ्या-फ्लेक्स पाडले, २० कोटींच्या खंडणी प्रकरणी गुन्हा

आयुष कोमकर खून प्रकरणानंतर पुणे पोलिस आणि महापालिकेने आंदेकर कुटुंबीयांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत काही दिवसांपूर्वी आंदेकरांचा अनधिकृत मासळी बाजार पाडण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी भवानी पेठ परिसरातील आंदेकरांच्या प्रभावक्षेत्रात अनधिकृत टपऱ्या, शेड, स्टॉल आणि फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम विभागाने ही कारवाई केली असली तरी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले. यामुळे छोट्या-मोठ्या अतिक्रमणांवर तातडीने प्रसिद्धीपत्रक काढणाऱ्या पालिकेची ही भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, आंदेकर टोळीविरुद्ध खंडणी प्रकरणीही गंभीर कारवाई करण्यात आली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात व्यापाऱ्यांकडून गेल्या १२ वर्षांपासून संघटितरीत्या खंडणी उकळल्याचा तपास पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी बंडू आंदेकरसह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये आंदेकर कुटुंबातील महिलेचाही समावेश आहे.

आयुष कोमकर खून आणि त्यानंतर सुरू झालेल्या कारवाईमुळे आंदेकर टोळी मोठ्या अडचणीत आली आहे. पोलिस आणि महापालिकेच्या कारवाईमुळे त्यांच्या आर्थिक मुळांवर परिणाम होत असून, खंडणी प्रकरणाने टोळीवरचा कायदेशीर दबाव आणखी वाढला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील