राष्ट्रवादी चे अधिक आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न, अनिल देशमुख यांचा आरोप

पुणे, ११ जुलै २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मलाच नाही तर अनेक आमदारांना अजित पवार यांच्याकडून संपर्क साधण्यात आला, पण मी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला.

अजित पवार यांच्या गटाला भाजपकडून लालूच दाखवले गेले होते का, या प्रश्नावर देशमुखांनी थेट भाष्य केले नाही. पण भाजपने मला वसुली घोटाळय़ाच्या बनावट आरोपाखाली अडकवले, त्यासाठी मला तुरुंगात जावे लागले, पण न्यायालयासमोर आरोप करणारेच उघडे पडले, खोटे आरोप केल्याची कबुली त्यांना द्यावी लागली आणि त्यामुळे माझी न्यायालयाने सुटका केली, अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी भाजपविरोधात राग व्यक्त केला

आता पवारांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. माझ्यासह अनेक आमदार शरद पवारांसोबत आहेत. पक्षाचे ८० टक्के जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते पवारांशी एकनिष्ठ आहेत. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांच्या बालेकिल्लात सभा झाली. या सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्ह्या-जिल्ह्यांत पवार जातील, तेव्हा वातावरण बदललेले असणार, असा दावा देखील अनिल देशमुखांनी केला आहे.

राज्यातील भाजपाच राजकारण जनता बघत आहे. त्यातच भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा खुला तमाशा जनतेने बघितला आहे. आधी शिवसेनेचे ३५-४० आमदार फोडले, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. तरीही राज्यातील भाजपची स्थिती सुधारली नाही. राज्यातील सरकार स्थिर झालेले नाही. अजित पवारांना घेऊन राष्ट्रवादीत फूट पाढण्यात आली. येवढे करूनही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळेल का, याची काही खात्री नाही. मग हे फोडाफोडीचे राजकारण करून भाजपच्या हाती काय मिळाले, असा सवाल देशमुख यांनी केला. जनतेच्या मनातून भाजप उतरत असून लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा जनतेला आता उबग आला आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा