वाईन शॉपप्रमाणेच, सुपरमार्केट आणि किराणा दुकानातही वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. या निर्णयाबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याप्रकरणात उडी घेतलीय. येत्या 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथे ते उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारला दुसरं समरण पत्र पाठवून त्यांनी तारीख जाहीर केलीय.
सरकारचं वाईन विक्रीचं धोरण घोषित झाल्यानंतरच अण्णा हजारे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली होती. , त्या संदर्भात पत्रही लिहिलं होतं. मात्र, सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतलाय. आता अण्णांनी या धोरणाच्या विरोधात उपोषण करण्याची घोषणा करून सरकारला अडचणीत आणलं आहे.
‘राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही या निर्णयावर आलो आहोत. लवकरच राज्यातील विविध सामाजिक संघटनांच्या समविचारी कार्यकर्त्यांची एक बैठक राळेगणसिद्धी येथे घेण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. सरकारने हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी जनतेची मागणी आहे. अन्यथा मला 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करावे लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
अण्णा हजारे यांनी काल पुन्हा उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं आपल्या पत्रात ते काय म्हणाले ते जाणून घेऊया.
या पत्रात अण्णा हजारे म्हणतात, “केवळ राज्याचा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचं दिसून येतं. पण या निर्णयामुळे लहान मुले व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, या गोष्टींचा विचार सरकारने केलेला नाही, याची खंत वाटते. युवा शक्ती ही आपली राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेसुद्धा आश्चर्यकारक आहे, असं अण्णा पत्रात म्हणाले.
यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठवली आहेत. तसंच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्याबाबतही पत्र पाठवलेलं आहे. आपणाकडून एकाही पत्राचं उत्तर देण्यात आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही तसंच घडताना दिसत आहे. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना मी कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेलं नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचं उत्तर देणं टाळलं जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणं-घेणं आहे की नाही, असा प्रश्न उभा राहतो, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे