शिंदे सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा, तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यांना मिळाले पालकमंत्री

मुंबई, २५ सप्टेंबर २०२२ : शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार यावरून विरोधकांनी राळ उठवली होती. पुढे पावसाळी अधिवेशन पार पडले आणि अतिवृष्टी झाली. या कालावधीत विरोधकांनी प्रशासकीय यंत्रणा ठप्प पडल्याच्या कारणावरून महाराष्ट्रात पालकमंत्री कधी मिळणार यावरून सरकारला धारेवर धरले होते. अखेर शिंदे सरकारने पालकमंत्र्यांची घोषणा करून या विषयावर पडदा टाकला आहे.

शिंदे आणि भाजप गोटातील आमदार मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेले होते. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी क्रमशा दिवाळीपूर्वी आणि नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहीर केले होते. आणि नंतर पालकमंत्र्यांची घोषणा होईल असे सांगितले होते. परंतु दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीची मंत्रिमंडळ विस्तारा अगोदरच घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक मंत्र्याला एकापेक्षा जास्त जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

सरकारकडून घोषणा करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वात जास्त ६ जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची जबाबदारी असणार आहे. त्या खालोखाल गिरीश महाजन यांच्याकडे जळगाव सह तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर महाराष्ट्रातील उर्वरित पालकमंत्री पुढील प्रमाणे आहेत

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांतदादा पाटील- पुणे
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे, लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन दीर्घकाळ लोटला तरीही राज्यात पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्यामुळे विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती. त्यातच यावर्षी पालकमंत्री नसल्यामुळे स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले होत. विरोधकांनी यावरूनही सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यावर आता अखेर यावर शिंदे सरकारने पालकमंत्र्यांची नावे जाहीर करून हा प्रश्न सोडवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा