नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२२ : भाजप, आम आदमी पार्टी ने प्रतिष्ठेच्या केलेल्या दिल्ली महानगरपालिकेच्या २५० जागांसाठी आता ४ डिसेंबरला मतदान होणार असून, ७ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील अशी घोषणा दिल्लीचे निवडणूक आयुक्त विजय देव यांनी आज केली.अनुसूचित जातींसाठी ४२ जागा राखीव आहेत तर महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असतील.
आम आदमी पार्टीने आरोप करणे सुरू केले असून, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप चे नेते दिल्लीत गुंतून पडावे यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने जाणून बुजून या तारखा निश्चित केल्या असे आप चे म्हणणे आहे.
दिल्लीत आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. ध्वनीक्षेपकांच्या वापरावर बंदी असेल. ध्वनीक्षेपकांच्या वापरासाठी परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेतल्यानंतरही रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकांचा वापर केला जाऊ शकणार नाही. दिल्लीत अवैध होर्डिंग्स आणि पोस्टर्सविरोधात कारवाई केली जाईल. मतदारांच्या सोयीसाठी निवडणुकीदरम्यान एक लाखांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात केले जातील. सर्व २५० वॉर्डांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान केले जाईल. यासाठी ५० हजारपेक्षा जास्त ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत.
दिल्ली महापालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेनंतर केंद्र सरकारने १८ ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली होती. उमेदवारांना ६८ ठिकाणी सकाळी १० ते ३ या वेळेत अर्ज दाखल करावे लागतील. एक उमेदवार निवडणूक प्रचारासाठी ८ लाख रुपये खर्च करू शकेल. गेल्या निवडणुकीत ही मर्यादा ५.७५ लाख होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे