इराण, ४ ऑक्टोंबर २०२२: इराणमध्ये हिजाबबाबत सुरू झालेला विरोध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सप्टेंबरमध्ये २२ वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या गोंधळाने आता संपूर्ण देश व्यापला आहे. या गोंधळात आता एका १७ वर्षीय मुलीलाही आपला जीव गमवावा लागलाय. निका शकरामी नावाच्या मुलीची हत्या करण्यात आलीय. इराणमध्ये हिजाबच्या विरोधात झालेल्या आंदोलनातही तिने भाग घेतला होता.
इराणमध्ये हिजाबवरून गदारोळ सुरूच
याआधी हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान एका मुलीने केस उघडे बांधल्याचे चित्रही व्हायरल झालं होतं. नंतर त्यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हदीस नजाफी असे त्या मुलीचं नाव आहे, जी इराणमधील टिकटॉक आणि इंस्टाग्रामची लोकप्रिय चेहरा होती. आता या गोंधळात १७ वर्षीय निका शकरामीचीही हत्या करण्यात आलीय. तिचं नाक तुटलं असून डोकं ठेचलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा निका विरोधानंतर गायब झाली तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. अटकेपासून ते पोलीस ठाण्यापर्यंत सर्वत्र तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी पोलिसांना निका शकरामीचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली. महसा अमिनीनंतर, निकाच्या या हत्येनं आधीच सुरू असलेला विरोध आणखी तीव्र केला आहे. या निदर्शनात आतापर्यंत ९२ जणांचा मृत्यू झालाय.
मात्र, या सर्व गोष्टींनंतरही जगभरात इराणी महिलांच्या हक्कांसाठी निदर्शनं वाढत आहेत. हिजाब जाळणाऱ्या आणि केस कापणाऱ्या महिलांची छायाचित्रं जगभरात सोशल मीडियावर गाजत आहेत. अनेक ठिकाणी पुरुषांनीही या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला आणि इटलीच्या बेला चाओ या प्रोटेस्ट गाण्याचं पर्शियन व्हर्जन गाऊन सरकारचा निषेध केला.
कसा सुरू झाला हा वाद?
या गोंधळाची सुरुवात २२ वर्षीय मेहसा अमिनी आहे. महसा अमिनी आता या जगात नाहीत. १६ सप्टेंबर रोजी तिचं निधन झालं. महसा अमिनीला पोलिसांनी १३ सप्टेंबरला अटक केली होती. तेहरानमध्ये अमिनी हिजाब नीट परिधान करत नसल्याचा आरोप करण्यात आला होता. तर इराणमध्ये हिजाब घालणं आवश्यक आहे. अमिनीला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तेथे तिची प्रकृती खालावल्याने अमिनीला रुग्णालयात नेण्यात आलं. तीन दिवसांनी अमिनीचा मृत्यू झाल्याची बातमी आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे