बलुचिस्तान, 9 मार्च 2022: पाकिस्तानच्या अशांत नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील सिबी जिल्ह्यात मंगळवारी स्फोट झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 28 जण जखमी झाले आहेत. आधी 3 जणांच्या मृत्यूची बातमी आली, नंतर ही संख्या 5 झाली.
जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, सिबीच्या जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पुष्टी केली आहे की सिबी जिल्ह्यातील थंडी रोडजवळ झालेल्या स्फोटानंतर तीन मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, 29 जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून हिंसक घटना घडत आहेत. बलुच बंडखोर गटांनी यापूर्वी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्प आणि या भागातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून अनेक हल्ले केले आहेत.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर अब्दुल कुद्दुस बिजेन्जो यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि स्फोटात जखमी झालेल्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
4 मार्च रोजीही पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 57 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. याआधी 3 मार्च रोजी पाकिस्तानातील क्वेटा येथे स्फोट झाला होता. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह तिघांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे