यूपीमध्ये भाजपला आणखी एक झटका, मंत्री दारा सिंह चौहान यांचा योगी मंत्रिमंडळातून राजीनामा

20

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022: उत्तर प्रदेशचे मंत्री दारा सिंह चौहान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे उत्तर प्रदेशातील ते दुसरे मंत्री आहेत. उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ आणि भाजपचा राजीनामा दिला होता. त्यांच्या समर्थनार्थ राज्यातील अन्य चार आमदारांनीही भाजपचा निरोप घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दारा सिंह चौहान हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री आहेत. दारा सिंह चौहान हे मऊच्या बधुबन मतदारसंघातून आमदार आहेत.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मध्ये यावेळी सर्वच पक्ष आपली पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाला निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील वन, पर्यावरण आणि प्राणीशास्त्र मंत्री दारा सिंह चौहान यांनी आपल्या राजीनामा पत्रात राज्य सरकारनं मागास, वंचित, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांकडं घोर दुर्लक्ष केल्याचं लिहिलं आहे. मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षणाशी खेळलं जात असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या अशा वृत्तीमुळं नाराज होऊन राजीनामा देत असल्याचं दारा सिंह चौहान यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य म्हणाले: मोठे बंधू, निर्णयाचा पुनर्विचार करा

यूपीचे डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करून कुटुंबातील एखादा सदस्य चुकीचा मार्ग पत्करला तर दुःख होतं असं म्हटलं आहे. निघणाऱ्या मान्यवरांना माझी एकच विनंती आहे की बुडत्या बोटीत बसून त्यांचं नुकसान होईल. ते म्हणाले की, मोठे बंधू दारा सिंह, तुम्ही तुमच्या निर्णयावर फेरविचार करा.

अखिलेश यादव म्हणाले- सपामध्ये आदरपूर्वक स्वागत, ‘मेला होबे’

दुसरीकडं, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, ‘सामाजिक न्याय’च्या लढ्याचे अथक सेनानी दारा सिंह चौहान यांचं सपामध्ये हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा! त्यांनी पुढं लिहिलं की, सपा आणि त्यांचे मित्रपक्ष एकत्र येतील आणि समता आणि समानतेची चळवळ टोकाला नेतील… भेदभाव नष्ट करतील! हा आमचा सामूहिक संकल्प आहे! शेवटी अखिलेश म्हणाले की, प्रत्येकाला आदर आहे, प्रत्येकाची जागा आहे. सपा प्रमुखांनी ट्विटच्या शेवटी ‘मेला होबे’ असंही लिहिलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे