राजस्थानमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, बसपा करणार विरोध

राजस्थान, दि. २७ जुलै २०२०: राजस्थान मधील राजकारण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. त्याबरोबरच काँग्रेसच्या अडचणी देखील वाढत चालल्या आहेत. न्यायालय मध्ये आधीच निकाल प्रलंबित असताना आता बसपाने देखील काँग्रेसच्या विरोधात पाऊल उचलले आहे. आता बसपाने उचललेल्या या पावलामुळे काँग्रेसला धोका आणखीनच वाढला आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी बहुजन समाज पार्टीने आपल्या आमदारांना काँग्रेसच्या विरोधात मतदान करण्यास सांगितले आहे. केवळ इतकेच नव्हे तर यासाठी बहुजन समाज पार्टीने आपल्या आमदारांसाठी व्हिप देखील काढला आहे.

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंड पुकारला. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून राजस्थान मध्ये राजकारण शिगेला पोहले आहे. राजभावना पासून ते न्यायालयापर्यंत सर्वत्र हा मुद्दा पोहचला आहे . तरीही सचिन पायलट मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान अशोक गहलोत यांनी लवकरात लवकर अधिवेशन घ्यावे या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. राजभवनावर देखील आंदोलन व घोषणाबाजीही करण्यात आली होती.

अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करण्याचाही इशारा दिला आहे. या सगळ्या घटना घडत असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राजस्थानात काँग्रेस विरोधात विरोधात भूमिका घेतली आहे.

राजस्थान मध्ये बसपाचे सहा आमदार

गेहलोत यांनी अधिवेशन घेण्याच्या मागणीवर जोर दिल्यानंतर काँग्रेस बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाने तातडीने व्हिप जारी केला आहे. राजस्थानात बसपाचे सहा आमदार असून, त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस विरोधात मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आर. गुढा, लाखन सिंह, दीपचंद, जेएस अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली अशी बसपा आमदारांची नावं आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा