आणखी एका मुंबईकराने नेला आपला संघ अंतिम फेरीत, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत

अबू धाबी, ९ नोव्हेंबर २०२०: दिल्ली कॅपिटलनं (डीसी) आयपीएलच्या १३ व्या सत्रातील क्वालिफायर -२ सामना जिंकला. रविवारी रात्री अबू धाबी येथे झालेल्या ‘डू ऑर डाय’ या सामन्यात दिल्लीनं सनरायझर्स हैदराबादला (एसआरएच) १७ धावांनी पराभूत केलं. १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायझर्सचा संघ निर्धारित २० षटकांत केवळ १७२/८ धावा करू शकला. सामनावीर मार्कस स्टोइनिसनं (३-०-२६–३) सनरायझर्सला केन विल्यमसनच्या महत्त्वपूर्ण विकेटसह तीन झटके दिले. कागिसो रबाडा (४-०-२९-४) यांनी चार विकेट घेऊन दिल्लीला विजय मिळवून दिला.

दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. दिल्लीने निर्धारित २० ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून १८९ धावा केल्या. दिल्लीकडून ‘गब्बर’ शिखर धवनने ५० चेंडूत ७८ धावांची खेळी केली. यामध्ये शिखरने ६ चौकार आणि २ षटकार खेचले. तर मार्कस स्टोयनिसने ३८ धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने २१ धावा केल्या. तसेच शेवटच्या काही षटकात शिमरॉन हेटमायरने फटकेबाजी केली. शिमरॉनने २२ चेंडूत नाबाद तडाखेबाज ४२ धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. हैदराबादकडून संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि रशिद खान या तिघांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. दरम्यान या विजयामुळं दिल्लीची गाठ अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध पडणार आहे. अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.

१९० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसननं अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्यानं ४५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार खेचत ६७ धावा केल्या.

विल्यमसन बाद झाल्यानंतर नवख्या अब्दुल समदनं २ चौकार आणि २ षटकार लगावत १६ चेंडूत ३३ धावा कुटल्या. पण रबाडाने १९ व्या षटकात त्याच्यासह राशिद खान आणि श्रीवत्स गोस्वामी दोघांना माघारी पाठवत सामना एकतर्फी केला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनीसने देखील ३ बळी टिपले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा