नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2021: दिल्लीत कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे झिम्बाब्वे येथील प्रवाशाचा जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीमध्ये दक्षिण आफ्रिकेचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह, भारतात आतापर्यंत 33 लोकांना कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झाली आहे.
दिल्लीत परदेशातून आलेल्या लोकांपैकी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. आतापर्यंत 25 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर दोन जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत.
भारतात Omicron ची 33 प्रकरणे
भारतात आतापर्यंत Omicron चे 33 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 17, राजस्थानमध्ये 9, गुजरातमध्ये 3, दिल्लीत 2 आणि कर्नाटकात 2 रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमधील सर्व 9 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही दिलासादायक बाब आहे. पुण्यातील रुग्णाचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. दुसरीकडे, कर्नाटकातील एक ओमिक्रॉनचा रुग्ण दुबईला पळून गेला आहे.
शुक्रवारी देशात ओमिक्रॉनचे 9 रुग्ण आढळले. त्यापैकी महाराष्ट्रात 7 आणि गुजरातमधील जामनगरमध्ये 2 प्रकरणे आढळून आली. महाराष्ट्रात आढळलेल्या प्रकरणांमध्ये मुंबईत तीन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत 4 प्रकरणे आढळून आली आहेत. मुंबईत सापडलेल्या बाधित रुग्णांचे वय ४८, २५ आणि ३७ वर्षे आहे. हे तिन्ही नागरिक टांझानिया, यूके आणि दक्षिण आफ्रिकेतून आले आहेत.
मुंबईतील ओमिक्रॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. 11-12 डिसेंबरसाठी येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. याशिवाय रॅली, मिरवणूक आणि मोर्चांनाही बंदी घालण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे