मुंबई, दि. १५ मे २०२०: राज्यभरात कोरोनाशी युद्ध लढताना पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. परंतू आपली ही जबाबदारी निभावत असताना त्यांना देखील याची लागण होत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आठ पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. आता त्यात आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूची भर पडली आहे.
मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या सहा झाली आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या एकूण नऊ झाली आहे.
या लढाईत पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस देखील २४ तास कार्यरत आहेत. कोरोनाविरुद्ध लढा देताना पॉझिटिव्ह आढळलेल्या १०७ पोलीस अधिकारी आणि ८९४ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आत्ता पर्यंत मुंबई ६, पुणे १, सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ९ पोलीस वीरांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी