ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा एक अतिरेकी कृत्य, पोलीस अधिकार्‍यासह कुटुंबातील तीन व्यक्ती ठार

जम्मू-काश्मीर, २८ जून २०२१: जम्मू-काश्मीरच्या त्राल येथे दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केलंय. दहशतवाद्यांनी एसपीओ फैयाज अहमद यांच्यासह कुटुंबातील तीन जणांना गोळ्या घालून ठार केलं. एसपीओ, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या.

ही दहशतवादी घटना दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हरीपरीगम त्राल भागात घडली. जेथे दहशतवाद्यांनी ४१ वर्षीय एसपीओ फैज अहमद, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना गोळ्या घातल्या. गोळी झाडल्यानंतर लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या दहशतवादी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला.

काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विट केलं की, दहशतवाद्यांनी हरिपरीगम अवंतीपोरा येथील एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या दहशतवादी घटनेत फैयाज, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर हा परिसर घेरला गेला आहे, दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

विशेष म्हणजे एसपीओच्या परिवारावर हल्ला होण्यापूर्वी जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनला दहशतवाद्यांनी ड्रोननं लक्ष्य केलं होतं. शनिवारी मध्यरात्री उच्च सुरक्षा हवाई दलाच्या स्टेशनमध्ये दोन स्फोट झाले. ज्यामुळं हवाई दल स्थानकाच्या इमारतीच्या छतावर छिद्र पडले आणि दोन सैनिक जखमी झाले. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. उधमपूरसह सर्व हवाई दलाच्या स्टेशनवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आणि जम्मू-काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

त्याचबरोबर वायुसेनेसह एनआयएनेही या हल्ल्याचा तपास सुरू केलाय. तातडीनं हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी जम्मू येथे पोहोचले, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: परिस्थितीविषयी माहिती घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा