उडुपी (कर्नाटक), २५ डिसेंबर २०२२ : केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी उडुपी येथील महात्मा गांधी स्टेडियम येथे क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले. हे क्रीडा विज्ञान केंद्र क्रीडा शास्त्रज्ञ आणि खेळाडूंना एकत्र आणेल. नजीकच्या काळात आणखी अनेक क्रीडा विज्ञान केंद्रे येतील, असे केंद्रीय मंत्री शनिवारी उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
श्री. अनुराग ठाकूर यांनी अधिकृत कार्यक्रमानंतर खेळाडूंसोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली आणि केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते महणाले, की खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी केवळ सरकारचीच नाही तर त्यांच्या पालकांचीही तेवढीच जबाबदारी आहे. एफएम स्टेशन सुरू करण्याच्या मागणीला उत्तर देताना श्री. ठाकूर म्हणाले, की येत्या चार महिन्यांत म्हणजे याच आर्थिक वर्षात एफएम स्टेशनची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले; तसेच राज्यभरात विज्ञान संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत केंद्र सरकारकडून सहकार्य करण्याचे आश्वासन माननीय मंत्रिमहोदयांनी दिले.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले, की दोन वर्षांत अनेक खेळाडू तयार होतील. या आर्थिक वर्षात ब्रह्मावरा येथे एफएम स्टेशन स्थापन करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल श्री. ठाकूर यांचे आभार मानले. या प्रकारची क्रीडा आणि विज्ञान केंद्रे उत्तर कर्नाटकात सुरू करावीत, असे कर्नाटकचे युवा सक्षमीकरण मंत्री म्हणाले. यावेळी उडुपीचे आमदार रघुपती भट व इतर मान्यवर उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड