नवी दिल्ली, ६ जुलै २०२१: राफेल लढाऊ विमानाच्या सौद्यावरून काँग्रेस पुन्हा एकदा एक्टिव झालेले दिसत आहे. माजी संरक्षणमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटनी यांनी सरकारवर हल्ला केलाय. एके अँटनी यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह लावून म्हटलंय की, प्रथम दर्शनी भ्रष्टाचार दिसून येत आहे. या खटल्याची चौकशी आणि दोषींना शिक्षा या संदर्भात सरकारचं मौन भ्रष्टाचार दडपण्याचा हेतू दर्शवितो.
अँटनी म्हणाले की, राफेल प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीला (जेपीसी) चौकशीचे आदेश देण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. राफेल सौद्यातील भ्रष्टाचारासंदर्भात कॉंग्रेसची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले आहेत. फ्रान्सच्या सरकारी वकील एजन्सी’नं राफेल व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्याला आता ४८ तास उलटून गेले आहेत, परंतु सरकारनं त्यावर मौन बाळगलंय. हे मौन रहस्यमय आहे, असं देशाचे माजी संरक्षणमंत्री म्हणाले.
सरकारनं गप्प राहणं का निवडलं असा सवाल कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. फ्रान्सच्या सरकारी वकील एजन्सी’नं भ्रष्टाचार आणि नफा मिळवून देण्याच्या चौकशीसाठी न्यायाधीश नेमणूक करण्यास सांगितलंय, याबाबत पंतप्रधान पुढं येऊन प्रतिक्रिया का देत नाहीत?
ते म्हणाले की, सरकार गप्प राहून भ्रष्टाचारासंदर्भात आपली जबाबदारी पेलू शकत नाही. अँटनी यांनी प्रश्न विचारला की राफेल डीलमध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे पुढं येऊन कबूल करणं ही सरकारची जबाबदारी नाही का?
देशाचे माजी संरक्षणमंत्री म्हणाले की, सरकारसमोर हा एकमेव मार्ग म्हणजे जबाबदारी स्वीकारणं आणि राफेल कराराबद्दलच्या आरोप आणि तथ्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र आणि निःपक्षपाती जेपीसी चौकशीचा आदेश देणं. महत्त्वाचे म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने राफेल सौदा हा मुद्दा बनविला होता आणि त्यात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर दुसरीकडं सरकार सर्व आरोप फेटाळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे