आईच्या हत्येनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली असावी: हरीश साळवे

नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर २०२०: अर्णब गोस्वामी यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर काही तासातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका (अपील) दाखल केली असून अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यावर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीतील न्यायपीठापुढं सुनावणी सुरु आहे. सुनावणीदरम्यान गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला की, “अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी.”

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (९ नोव्हेंबर) अर्णब गोस्वामी यांना तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्या वतीनं युक्तिवाद करताना हरिश साळवे म्हणाले की, “अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली, अशीही शंका आहे. अर्णब गोस्वामी यांनी सर्व वेंडर्सना नियमित पैसे दिले आहेत.” तसंच हे प्रकरण पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांचं पालन केलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.

सुनावणी दरम्यान, हरिश साळवे यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. “जर या प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप केला नाही तर ते चुकीच्या मार्गानं पुढं जाईल. तुमची विचारधारा वेगळी असू शकते. परंतु न्यायालयाला स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे. जर न्यायालय स्वातंत्र्याचं रक्षण करणार नाही तर कोण करेल?,” असं मतही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी नोंदवलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा