अन्यथा १५ जानेवारीपासून “छपाक” बंद करा

मुंबई : अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्ण भट्ट यांना या चित्रपटात श्रेय देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं निर्मात्यांना दिले आहेत. पीडितेच्या वकीलांना श्रेय न दिल्यास १५ जानेवारीनंतर हा चित्रपट दाखवता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

न्यायमूर्ती प्रतीभा एम.सिंग यांनी शनिवारी यासंदर्भात निकाल दिला आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा सिंग यांच्याकडून घटनेची माहिती घेतली गेली. परंतु त्यांना चित्रपटात श्रेय का देण्यात आलं नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयानं चित्रपटाच्या निर्मात्यांना केला होता. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती प्रतीभा सिंग यांनी याबाबत आपला निकाल राखून ठेवला होता.
चित्रपटाचे निर्माते लक्ष्मी यांच्या वकीलांकडे माहिती मागण्यासाठी का गेले होते? तसंच त्यांना या चित्रपटात श्रेय देण्यास काय अडचण आहे, असा सवाल न्यायालयानं यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान केला होता. दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार झाला नव्हता. तसंच माहिती घेतल्यानंतर त्यांना श्रेय देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं चित्रपटाच्या दिग्दर्शिका मेघना गुलझार यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.

आपण अनेक वर्षे लक्ष्मी अग्रवाल यांच्या बाजूनं न्यायालयात खटला लढला आहे. चित्रपट तयार करताना स्क्रिप्ट तयार करण्यातही मदत केली होती. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचं श्रेय देण्यात आलं नाही, असं भट्ट यांनी न्यायालयाला सांगितलं होतं. १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत आपण मेघना गुलझार यांच्या संपर्कात होतो. चित्रपट प्रदर्शित होताना त्यांना श्रेय दिलं जाईल, असं सांगण्यात आलं होतं. परंतु ७ जानेवारी रोजी चित्रपटाच्या प्रमिअरदरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचं श्रेय दिलं नसल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा