माढा मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचे आवाहन

माढा, २८ डिसेंबर २०२०: माढा विधानसभा मतदारसंघामधील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील  ११५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, यामध्ये  बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पंधरा लाख रुपयांचा विशेष निधी देणार असल्याचे माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांनी जाहीर केले.

यावर्षी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये माढा तालुक्यातील सर्वाधीक ८२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या माढा तालुक्यातील ६१, पंढरपूर तालुक्यातील २७  व माळशिरस तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीचा सामावेश आहे.

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असताना सामाजिक अंतर पाळणे, नियमांचे काटेकोरपणे पालन करणे जिकीरीचे होणार आहे, याचबरोबर निवडणुकांसाठी शासनाचा व उमेदवारांचा अनावश्यक खर्च होतो. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध करण्याकडे गावा-गांवातील नेतेमंडळींनी प्रयत्न करावेत असे आवाहन आ. बबनराव शिंदे यांनी केले आहे.

“बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी आपण १५ लाख रु. चा विशेष निधी ग्रामपंचायत जी कामे सुचवतील त्यासाठी आमदार निधीतून देऊ” असे सांगुन आ. शिंदे म्हणाले कि, “पंचायतराज व्यवस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत हा विकासाचा घटक असून गावच्या विकासासाठी गावातील नेतेमंडळी, मतदार यांनी राजकारण न आणता बिनविरोध पध्दतीने ग्रामपंचायत निवडणुक पार पाडल्यास त्याचा गावाच्या कल्याणासाठी फायदा होईल.” त्यामुळे निवडणूक लागलेल्या गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन बबन दादा शिंदे यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा