नवी दिल्ली, ६ ऑक्टोंबर २०२२: अमेरिकन कंपनी ॲपल पुन्हा चीनला धक्का देण्याची तयारी करत आहे. अलीकडेच कंपनीने चीनमध्ये आयफोनचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आगामी काळात सर्वाधिक उत्पादन भारतातच होणार आहे. आता एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की कंपनी एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचं उत्पादन भारतातही हलवू शकते.
वृत्तसंस्था रॉयटर्सने निक्केईच्या एका अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की ॲपल ने पुरवठादारांना एअरपॉड्स आणि बीट्स हेडफोन्सचं बहुतांश उत्पादन भारतात हलवण्यास सांगितलं आहे. देशात आयफोनची निर्मिती करणारी फॉक्सकॉन भारतातच बीट्स हेडफोन तयार करण्याच्या तयारीत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.
एअरपॉड्स देखील तयार केले जाऊ शकतात
यासोबत एअरपॉड्सची निर्मितीही केली जाईल, असा विश्वास आहे. अहवालात या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन व्यक्तींचा हवाला देण्यात आलाय. अहवालात असंही म्हटलं आहे की जर असं झालं तर हा भारताचा मोठा विजय असंल कारण यामुळं जागतिक पुरवठा साखळी वाढेल.
अहवालानुसार, सध्या चीन आणि व्हिएतनाममध्ये एअरपॉड्सचं उत्पादन करणारी लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट्री ॲपलला लोकप्रिय वायरलेस इयरफोन्स बनवण्यात मदत करणार आहे. फॉक्सकॉनने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
ॲपल ने २०१७ मध्ये लहान सप्लायर विस्ट्रॉनसोबत आयफोनचं उत्पादन भारतात सुरू केलं होतं. कंपनीचा लेटेस्ट आयफोन १४ सीरीज देखील देशात तयार केला जाईल. हे स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी तयार केले जाईल.
अहवालात असं सांगण्यात आलंय की, यापूर्वी कंपनी भारतात उत्पादन करण्याचा आणि स्थानिक बाजारपेठेचा पुरवठा पूर्ण करण्याचा विचार करत होती. पण, आता कंपनी भारताला उत्पादन बेस बनविण्याचे काम करत आहे. याद्वारे देशात तयार होणारी उत्पादनं युरोपसह अन्य बाजारपेठांमध्येही निर्यात केली जाणार आहेत.
चीनला बसेल धक्का
कंपनीच्या या हालचालीमुळं चीनला धक्का बसंल. जागतिक पुरवठा साखळीतील चीन हा मोठा खेळाडू आहे. पण, सतत लॉकडाऊन आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचा फायदा भारताला होताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे