भारतात लवकरच लॉन्च होणार ॲप्पलचे क्रेडिट कार्ड

नवी दिल्ली २५ जून २०२३: सध्या अमेझॉन, सॅमसंग आणि गुगल सारख्या टेक कंपन्या, पेमेंट्स क्षेत्रात त्यांचा व्यवसाय वाढवत आहेत. या तिन्ही कंपन्यांनी आपापली को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड भारतात लॉन्च केली आहेत. आता यात ॲप्पल क्रेडिट कार्डची भर पडणार आहे. टेक कंपनी ॲप्पल लवकरच भारतात आपले पहिले क्रेडिट कार्ड ‘Apple Card’ लॉन्च करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ॲप्पल भारतात त्यांचे क्रेडिट कार्ड सादर करण्यासाठी HDFC बँकेसोबत भागीदारी करण्याचा विचार करत आहे. ॲप्पल गेल्या काही वर्षांपासून आपली उत्पादने बनवण्यासाठी भारतावर लक्ष केंद्रित करत आहे. अलीकडेच कंपनीने भारतातून आयफोन निर्यात करण्याचा नवा विक्रम केला आहे.

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या अहवालानुसार, मे महिन्यात भारतातून एकूण १२००० कोटी रुपयांची स्मार्टफोन निर्यात झाली, ज्यापैकी ८०% आयफोन होते. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भारताने जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांचे iPhones निर्यात केले. निर्यात करणाऱ्या ब्रँड पैकी, आयफोन हा भारतातील उच्चतम टप्पा गाठणारा पहिला ब्रँड बनला आहे. अशा परिस्थितीत, भारतात स्वतःचे क्रेडिट कार्ड सुरू करून, कंपनी पेमेंट क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढवू पाहतेय.

ॲप्पलचे सीईओ टिम कुक यांनी एप्रिलमध्ये भारत दौऱ्यावर असताना एचडीएफसी बँकेचे सीईओ आणि एमडी शशिधर जगदीशन यांची भेट घेतली होती. हे कार्ड कंपनीचे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड असेल. मात्र, अद्याप ॲप्पल किंवा एचडीएफसी बँकेकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ॲप्पलच्या अधिकाऱ्यांनीही कार्डबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी (RBI) चर्चा केली आहे. आरबीआयने ॲपलला कार्डसाठी विहित प्रक्रियेचे पालन करण्यास सांगितले असून, त्यांनी स्पष्ट केलय की ॲप्पलला भारतात क्रेडिट कार्ड आणण्यासाठी विशेष हक्क दिले जाणार नाही.

ॲप्पल सध्या फक्त यूएस मध्ये क्रेडिट कार्ड देते. तिथे गोल्डमन सॅक्स आणि मास्टरकार्ड यांच्या संयुक्त भागीदारीतून ही कंपनी सुरू करण्यात आलीय. यूएस मध्ये कंपनी उशीरा पेमेंट करण्यासाठी कार्डधारकांकडून विलंब शुल्क आकारत नाही. असे सांगण्यात येत आहे की भारतातही ॲप्पल कंपनी, थकीत बिलांच्या उशीरा पेमेंटसाठी शुल्क आकारणार नाही. कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या कर्ज पेमेंटवर व्याज द्यावे लागेल. यासोबतच या कार्डद्वारे पेमेंट करून ॲप्पलची उत्पादने खरेदी केल्यास त्यांना कंपनी कॅशबॅक सूट देईल.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा