पिंपरी चिंचवड शहरात संभाजी बिडी विक्रीला विरोध

पिंपरी चिंचवड, २७ ऑगस्ट २०२०: छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या उभ्या आयुष्यात काडीचे ही व्यसन नव्हते आणि अशा महापुरुषाच्या नावाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संभाजी ब्रिगेड कडून पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये सतिश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ ते २०१३ साली जन आंदोलन उभे करण्यात आले होते. सतत अनेक आंदोलने करण्यात आली होती.
या आंदोलनामध्ये संतोष शिंदे, प्रशांत चव्हाण, ज्ञानेश्वर लोभे, उध्दव शिवले, नकुल भोईर, साहेबराव साळुंके, परमेश्वर जाधव, सचिन कोरडकर, यांचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी साबळे आणि वाघिरे कंपनी बरोबर पाठपुरावा करून कंपनी बरोबर झालेल्या बैठकीत संभाजी महाराज यांचे चित्र काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि २०१३ मध्ये संभाजी बिडी बंडल वरून छत्रपती संभाजी महाराजांचे चित्र हटवण्यात आले होते. तसेच बिडीचे नाव अचानक बदलणे व्यवसायिक अडचणी मुळे शक्य नाही. पण, कालांतराने नावातही हळूहळू बदल केला जाईल असे लेखी आश्वासन साबळे वाघिरे आणि कंपनी यांनी दिले होते.
त्या वेळीच संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास मोठं यश आलं होत. परंतु, आज नऊ वर्षे होत आली पण नावात बदल करण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे.  परंतु, कंपनीच्या व त्यामध्ये काम करणारे अनेक कुटुंब तसेच नोकरदार वर्गाकडे पाहून इतके दिवस संभाजी ब्रिगेड शांत होती. परंतु, याचा गैरफायदा घेतला जातो असे निदर्शनास आल्यावर पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज आहे. आणि म्हणूनच काल बुधवार दिनांक २६-८-२०२० रोजी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील बर्यांचशा तंबाखूजन्य पदार्थ ठोक विक्रेत्यांना भेटून संभाजी बिडी आपण विक्री करु नये असे आवाहन करण्यात आले होते.
आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत थेरगाव येथील व्यापाऱ्यांनी साबळे आणि वाघिरे कंपनीचा संभाजी बिडीचा माल कंपनीला परत पाठवण्याचा निर्णय घेऊन तो माल लगेच परत कंपनीकडे परत पाठवण्यात आला आणि भविष्यात संभाजी बिडी नावाने असलेला माल येथून पुढे कोणत्याही व्यापार्यांनी विकू नये असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच साबळे आणि वाघिरे कंपनी कडून याची दखल न घेतल्यास संभाजी बिडी नावाने महाराष्ट्रात माल वाहतूक करणाऱ्या गाड्यावरती संभाजी ब्रिगेड स्टाईल ने कारवाई करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते संघटक परमेश्वर जाधव हणुमंत चव्हाण अतुल कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा