पुणे, 11 नोव्हेंबर 2021:महाराष्ट्राची प्रवासी व सर्वसामन्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जणारी ‘लालपरी’ सध्या बंद आहे. मागील काही वर्षांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी एसटीला राज्यसरकार कर्मचारी म्हणून सामावून घेण्याच्या व अश्या विविध मागण्या संदर्भात राज्य शासनाशी चर्चा करत आहेत. या संदर्भात अनेकवेळी राज्यात आंदोलन देखील झाले आहेत आणि यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील राज्यशासनाकडून दिले गेले. परंतु अजूनही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तीव्र आंदोलन झालेली आहेत. या आंदोलना दरम्यान ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे.
कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेल्या कामबंद आंदोलन प्रसंगी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. परंतु योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे आता पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे व त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूकी संदर्भात गैरसोय होत आहे. आज ११ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू होत आहेत. विद्यार्थी बस पास काढून प्रवास करतात अनेक वाडी, वस्ती, पाडे व गावांत प्रवासासाठी दुसरी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे.योग्य त्या मागण्या ग्राह्य धरून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा असे मागणी पत्रक काल अभाविपने मा.राज्यपाल, मा. मुख्यमंत्री महोदय, मा. परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिले. यावेळी मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यात राज्यसरकार अपयशी ठरलेले आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय देत तोडगा काढावा व अभाविप एसटी कर्मचाऱ्यांन सोबत आहे असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी