पुणे, दि.१० जून २०२०: पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाण पूल पाडण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तर्फे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे.
येथे उड्डाणपूल बांधताना महापालिका कोणताही खर्च देणार नाही, नवीन टेंडर मंजूर होईपर्यंत पूल पाडू नये आणि वाहतुकीचे नियोजन करावे, अशा उपसुचनेसह पूल पाडण्यासाठी मंजुरी दिल्याची माहिती रासने यांनी दिली.
हा उड्डाणपूल चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आला आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी या पुलावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडून नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे . तसेच उड्डाणपूल आणि मेट्रो यांचा एकात्मिक आराखडा करण्यात आला आहे.
पीएमआरडीएकडून त्याचे काम करण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल पाडून दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २४० कोटी रुपये खर्च होणार आहे. सध्याचा उड्डाणपूल १३ वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. सध्या कोरोनाचे संकट आहे.लॉकडाऊनच्या काळात हा पूल तातडीने पाडून मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: