अरबाज अहमद मीरला केले दहशतवादी घोषित

नवी दिल्ली, ७ जानेवारी २०२३ : गृह मंत्रालयाने अरबाज अहमद मीरला दहशतवादी घोषित केले. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित असलेला मीर सध्या पाकिस्तानमध्ये आहे. सीमेपलीकडून तो लष्कर-ए-तोयबासाठी काम करतो. त्यामुळे बेकायदेशीर कृत्ये अधिनियम, १९६७ अंतर्गत त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारत सरकारने पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट
(PAFF) ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे.

गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली, त्यानुसार पीपल्स ॲंटी फॅसिस्ट फ्रंट या संघटनेवर बेकायदेशीर कृत्य कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे‌. ही संघटना २०१९ मध्ये जैश-ए-मोहम्मदची प्राॅक्सी संघटना म्हणून उदयास आली. केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे, की PAFF सुरक्षा दल, राजकीय नेते आणि जम्मू-काश्मीरमध्ये काम करणाऱ्या इतर राज्यांतील नागरिकांना वारंवार धमक्या देत आहे.

अधिसूचनेनुसार, PAFF इतर संघटनांच्या सहकार्याने तरुणांना शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांसह हल्ले करण्यासाठी भरती करीत आहे. त्यानुसार ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. यापूर्वी ५ जानेवारी रोजी सरकारने लष्कर-ए-तोयबाची संलग्न संघटना असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटवर (TRF) बंदी घातली होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर