अर्चना नष्टे आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित

कर्जत, ३ जुलै २०२०: कर्जतच्या उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे यांना आदर्श उपजिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी महसूल दिनाचे औचित्य साधत नाशिक विभागातील महसूल क्षेत्रात उत्कृष्ट सेवा आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा आदर्श उपजिल्हाधिकारी पुरस्कार कर्जत येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांना अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रदान करण्यात आला.

यासह कर्जत तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी परमेश्वर पाचारणे यांना सुद्धा यंदाचा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, तहसीलदार वैशाली आव्हाड यांच्यासह सर्व सत्कार मूर्ती उपस्थित होते. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह मंडळ अधिकारी पाचारणे यांचे कर्जत महसूल विभागाच्यावतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.

कर्जतच्या उपविभागीय तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे या २०१४ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी परीक्षा उत्तीर्ण आहेत. यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे परिविक्षाधीन प्रांताधिकारी म्हणून काम पाहिले असून जून २०१७ साली त्या कर्जतच्या प्रांताधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. कोरोना काळात त्यांचे कार्य कर्जत-जामखेडकरांनी पाहिले आहे. जामखेडची कोरोना साखळी तोडण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा