काँग्रेस आमदार सत्तेत सहभागी होण्याच्या तयारीत? भाजप खासदार रणजिससिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा दावा

पंढरपूर, २९ जुलै २०२३ : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय उलथापालथ होईल याचा नियम नाही. मागील वर्ष सव्वा वर्षातील घडामोडी याची साक्ष देतात. एक महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि ते थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व मंत्र्यांना आता खातेवाटपही झाले आहे. राष्ट्रवादीच्या या गटाला चांगली महत्वाची खाती मिळाली आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट विरोधी पक्षात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्षात आहे. तसचे शिवसेना पक्षात वर्षभरापूर्वी मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे आपल्या ४० समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यातूनच एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. पण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना ही विरोधी पक्षात आहे. सध्या तरी काँग्रेस पक्ष एकसंघ दिसत आहे. पण भाजपकडून काँग्रेसबद्दलही मोठा दावा करण्यात आला आहे.

सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले याला आता वर्ष उलटले आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या तीन मोठ्या पक्षांपैकी दोन मोठ्या पक्षांमध्ये मोठी विभागणी झाली आहे. फक्त काँग्रेस हाच पक्ष फुटलेला नाही. पण काँग्रेस पक्ष हा फुटीच्या मार्गावर असल्याच्या वावड्या सतत उठत असतात. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडून त्याचे खंडन केले जाते. त्याचबरोबर काँग्रेस एकसंघ असल्याचा दावा केला जातो. पण तरीही काँग्रेस पक्षाच्या फुटीबाबत नेहमी वेगवेगळ्या बातम्या समोर येतात.

यावेळी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसबद्दल मोठा दावा केला आहे. काँग्रेस पक्ष लवकरच महविकास आघाडीमधून बाहेर पडणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षच महाविकास आघाडी फुटायला जबाबदार ठरणार आहे. काँग्रेसमधील काही आमदार सत्तेत येण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा रणजिससिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये राहून काही उपयोग नाही अशी काँग्रेस आमदारांची भावना आहे. त्यामुळे ते सत्तेत सामील होतील आणि तिकडे फक्त शेष राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिल्लक राहिल, असे मोठे वक्तव्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा