मुंबई, दि. २१ सप्टेंबर २०२०: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी ”काही आयपीएस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते” असा गौप्यस्फोट केला. मात्र गृहमंत्र्यांनी कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव सांगितले नाही, त्यामुळे हे ”सरकार द्रोही” अधिकारी नेमके कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की राज्यातील काही आयपीएस अधिकारी उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोक्का एनआयए अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
त्याचबरोबर या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात यावी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नावे जाहीर केली नाही तर त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या द्रोह करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. असंंही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकरांच्या या मागणीनंतर गृहमंत्री त्या तथाकथित ”सरकार द्रोही” अधिकाऱ्यांची नावे जाहीर करतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अक्षय बैसाणे