नाशिक, २८ जून २०२३ : समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांना अटक व्हायलाच हवी. त्यांनी जे म्हटले, हे जर दुसरे कोणी म्हटले असते. तर आतापर्यंत देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
संभाजी भिडे यांनी पुण्यातील दिघी येथे बोलताना भारतीय स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. त्या दिवशी दुखवटा पाळावा, असे विधान संभाजी भिडे यांनी केले आहे.
संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. छगन भुजबळ यांनी ही भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडकडून आज आंदोलन केले जाणार आहे.
न्यूज अन कट प्रतिनिधी – अनिल खळदकर