सोलापूर, दि. ३० जून २०२० : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील होलसेल किराणा व्यापारी प्रवीण उर्फ बंडू ढवळसकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन जेरबंद करण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने प्रांताधिकारी ज्योती कदम व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२३ जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील किराणा व्यापारी प्रवीण काशिनाथ ढवळसकर व त्यांचे थोरले बंधू विश्वनाथ ढवळसकर हे दुकान बंद करून घराकडे जात असताना कुबेर मंगल कार्यालयासमोर तिघा हल्लेखोरांनी त्यांच्या जवळील शस्त्राने गोळी झाडून प्रवीण ढवळसकर यांना जखमी केले व प्रवीण यांच्या जवळील बॅग घेऊन टेंभुर्णी रोडच्या दिशेने पळ काढला. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा सोलापूर यांच्याकडे देण्यासंबंधी वरिष्ठांना निर्देशीत करावे असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी आमदार संजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या.
यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष मिलिंद डिकोळे सचिव महेश वाळुजकर, रवींद्र टोकडे, सागर कोले, स्वप्निल ठोकडे, शिवराज वायचळ, बाबुशेठ ढवळसकर, प्रशांत कोल्हे आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील