आर्यन्स नवदुर्गा सन्मान २०२३” चे दिमाखात वितरण, महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न महिलांचा ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्‌’ने केला सन्मान

पुणे, ३० ऑक्टोबर २०२३ : प्राचीन काळापासून भारतीय आर्य संस्कृतीत स्त्रीला शक्ती मानलं गेलं आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः’ म्हणजे जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो आणि जिथे स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळत नाही तिथे कोणतंही कार्य सफल होत नाही. याच वचनाचं स्मरण करून ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्‌’ने सुरु केलेला ” आर्यन्स नवदुर्गा सन्मान “हा पुरस्कार सोहळा शनिवार, दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यातील हॉटेल प्राईड येथे पार पडला.

नवनीत नवगुणी नवोन्मेषधात्री, नवरुपे नवरंगे अशी नवरात्री नवनवल नवोदयी नवनवीनक्षेत्री, नवमाता नवभार्या तशी नवपुत्री, नवध्यानी नवध्यासी नवतागायित्री, नवजिजाऊ नवलक्ष्मी अन्‌ नवसावित्री, नव-लक्षणा नवल-क्षणा नवचारूगात्री, नवभासा नवश्वासा नवनवरसपात्री. अशा शब्दात महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न महिलांचा ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्‌’ने सन्मान केला.

या कार्यक्रमात वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या नऊ प्रतिभाशाली दुर्गांना गौरविण्यात आले. यात माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या मा.वनिता पिसे आणि त्यांच्या सहकारी मा.सुमनताई गायकवाड, मा.सखुबाई लोखंडे यांना तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नामवंत सर्जन डॉ.रुची ठाकूर, सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ.मानसी पवार, प्रसिद्ध टॉक्सिकोलॉजिस्ट डॉ.किशोरी आपटे, वृद्धांसाठी कार्यरत असलेल्या मा.ज्योती पटाईत, कीर्तनकार आणि समाजप्रबोधक मा. ह.भ.प. गीतांजली भुजबळ, कुस्त्यांचा फड गाजवणारी महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी, कॉस्मोटोलॉजिस्ट तसेच हेअर कट मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मा.रीना देवरुखकर आणि पोस्टमॉर्टम वुमन म्हणुन प्रसिद्ध असलेल्या मा.शीतल चव्हाण यांना आर्यन्स ग्रुप तर्फे “आर्यन्स नवदुर्गा सन्मान २०२३” चा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा