मिझोराम, १७ ऑक्टोबर २०२२:मिझोराममध्ये पोलिसांनी वन्यजीवांच्या तस्करीे प्रकरणात ४ आंतरराष्ट्रीय तस्करांना अटक केलीय. चंफाई पोलिस, अबकारी पथक आणि मिझोरामच्या अंमली पदार्थ विभागाने ही कारवाई केली आहे. पथकाने तपासणीदरम्यान २ बोलेरो आणि १ स्कॉर्पिओ गाडी अडवली. चेकिंग दरम्यान गाड्यांमध्ये अनेक प्राणी छोट्या छोट्या पिंजऱ्यात कैद केलेले आढळून आले. यानंतर गाड्या जप्त करण्यात आल्या. चौकशीत हे सर्व प्राणी शेजारच्या म्यानमारमधून आणल्याचे निष्पन्न झाले. हे प्राणी सीमाशुल्क प्रतिबंधक दलाच्या (सीपीएफ) ताब्यात देण्यात आले आहेत.
पोलिसांनी तस्करांपासून १४० पशू-पक्ष्यांची सुटका केली. त्यात वेगवेगळया जातीचे पक्षी तसेच ३० कासव, २२ अजगर आणि ५५ मगरींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विदेशी प्राणी शेजारच्या म्यानमारमधून आणण्यात आले होते. यामध्ये दोन्ही देशातील तस्करांचा सहभाग होता.
देशात वन्यजीवांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईत डीआरआयने ६६५ विदेशी प्राणी जप्त केले होते. त्यात अजगर, सरडे, कासव आणि इगुआना होते. या विषयावर वन्यजीव प्रेमी चिंता व्यक्त करत असून तस्करांवर कठोर कारवाई करावी तसेच सरकारने वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी ते करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे