रत्नागिरी १५ नोव्हेंबर २०२३ : रत्नागिरी शहरापासून १० किमी.अंतरावर असलेल्या सडये येथिल तरूणांनी येथील सड्यावर तब्बल ३० कातळशिल्पे शोधली आहेत. सडयेतील तरूणांकडून दरवर्षी प्रमाणे दिवाळीत हि कातळशिल्प शोधयात्रा काढली जाते. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. येथे रेड्यांची, मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर इतर अनेक चित्रे प्रथमच आढळली आहेत.
यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी प्रसिध्द असलेल्या ठिकाणी काढण्यात आली होती. या उपक्रमातून सडयेच्या सड्यावरील कातळशिल्पे शोधून त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. सडे-कातळ धुंडाळून त्यावरील पाण्याचे स्त्रोत, प्राचीन देवस्थाने, देवराया, पाण्याची टाकी, बारव, कातळशिल्पे, घाट्या, सड्यावरील जीवसृष्टी, रानटी झाडे आणि त्यांचे औषधी उपयोग आदी.ची माहिती सडयेतील तरूण-तरूणी, विद्यार्थी एकत्रितरित्या बुजुर्गांच्या मदतीने घेत असतात.
यावर्षीच्या पदयात्रेचे मार्गदर्शन सडये-पिरंदवणे-वाडाजून परिसराची इत्यंभूत माहिती असणारे रानमाणूस आत्माराम धुमक यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनीधी : केतन पिलणकर