ठाणे : २१ जानेवारी २०२२; मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधील तब्बल ४२ लाख उत्तर भारतीय उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याकरिता तिकडे निघाले आहेत किंवा अनेक जण कोरोनाच्या भीतीने अजून तिकडेच आहेत.
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका व मुंबई महापालिका निवडणूक साधारणपणे जवळपास येत असल्याने या मतदाराला
तिकडे जाण्यापासून रोखण्याकरिता राजकीय पक्षांना धडपड करावी लागते. मात्र यावेळी महापालिका निवडणुकीचा पत्ता नसल्याने उत्तर प्रदेशात ‘परदेशीबाबू’ अशी ओळख असलेली ही मंडळी यावेळी भरभरून मतदान करतील, अशी अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेशात निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत डिसेंबरच्या अखेरपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाल्याने उत्तर प्रदेशातील जी मंडळी मुंबईत आहेत त्यांनी गावाकडची वाट धरली. दुसऱ्या लाटेच्या वेळी उ.प्र.मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी येथील मंडळींनी तिकडे धाव घेऊन मतदान केले होते, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरचिटणीस अरविंद तिवारी यांनी लक्ष वेधले. उत्तर भारतीय महापंचायतचे विनय दुबे म्हणाले की, महाराष्ट्रात ८० लाखांच्या आसपास उत्तर भारतीय असून त्यापैकी ४२ लाख हे तिकडे व येथे मतदार आहेत. कोरोनामुळे त्यापैकी २५ टक्केच परतले आहेत.
भोजपुरी इंडस्ट्री उतरली मैदानात ;
भोजपुरी सिनेस्टार्स निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, रवीकिशन, दिनेशलाल यादव, निरुव्वा ,मनोज तिवारी हे भाजपसाठी प्रचार करणार असून खोसारीलाल यादव हे समाजवादी पार्टीसाठी प्रचार करणार आहेत.
न्यूज अन कट प्रतिनिधी ; किरण कानडे.