पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतच सापडले तब्बल ४४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक, २९ जुलै २०२०: कोरोना योध्यांसाठी ढाल मानले जाणाऱ्या पीपीई किट निर्माण करणाऱ्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतील पालखेड औद्योगिक वसाहतीत पीपीई किट तयार करणारी ही कंपनी आहे. या कंपनीतील तब्बल ४४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालखेड एमआयडीसी मध्ये असलेली ही पीपीई किट निर्माण करणारी कंपनी तातडीने बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ४४ रूग्णांना कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच या ४४ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या सगळ्या घडामोडीत आता एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो असा की, यादरम्यान कंपनीने निर्माण केलेल्या या पीपीई किट चे जिथे जिथे वितरण झाले आहे तेथील कर्मचाऱ्यांचे आरोग्य आता धोक्यात आहे. कारण या कंपनी मध्ये पीपीई किट चे निर्माण कशा पद्धतीने केले जात होते याबाबत आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

या कंपनीत मानवी स्पर्शाविना काम चालतं का? नसल्यास या कंपनीत उत्पादन झालेल्या पीपीई किटचे काय होणार? त्याची तपासणी होणार का? गेल्या काही दिवसातील काही बॅचचा माल विकणे किंवा वापरावर बंदी येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा