पुणे-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तब्बल ६० सीएनजी पंप आज राहणार बंद

पुणे, १ ऑक्टोबर २०२२ : वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १) एक दिवस पुणे-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सीएनजी टोरेंट कंपनीचे द्रुतगती महामार्गावरील पंप बंद राहणार आहेत. असे असले तरीही शहरातील पंप सुरू राहणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ता अली दारूवाला यांनी स्पष्ट केले. त्यामुळे द्रुतगती मार्गावर वाहन मालकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. तसेच, शहर आणि द्रुतगती महामार्गावरील पेट्रोल आणि डीझेलच्या पुरवठ्यावर या बंदचा कोणताच परिणाम होणार नाही. त्यामुळे वाहन चालकांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.

आजच्या संपामध्ये एकूण ६० सीएनजी पंप सहभागी झाल्याची माहिती मिळतेय. याचा फटका इतर पंपांवर जाणवण्याची दाट शक्यता आहे. पुण्यात सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुण्यात सीएनजीवर वाहनं चालवण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. अशावेळी एक दिवसाच्या संपाचा फटका अनेकांना बसणार आहे.

दरम्यान, टोरेंट सीएनजी पंप जरी एक दिवसासाठी बंद असले, तरी दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेल पंप सुरुच राहणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांना एक दिवस पेट्रोल-डिझेलच्या पर्यायवर वेळ मारुन नेता येऊ शकेल. पेट्रोल, डिझेलच्या पंपाचा एक दिवसाच्या सीएनजी संपाशी कोणताही थेट संबंध नसल्यानं पुणेकरांना दिलासा मिळालाय.

सात दिवस आधीच कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, मागणीचं पत्र देण्यात आलं होतं. मात्र ही मागणी काही मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर टोरेंट सीएनजी स्टेशन असलेले सर्व सीएनजी पंप आज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा