तिने दिला लग्नाला नकार म्हणून त्याने चाकून केले १२ वार

पाटणा : ३१ मे २०२३ : बिहारच्या सीतामढीमध्ये एका प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. बथनाहा ब्लॉक परिसरातील दिग्गी पंचायतीमधील एका गावातील ही घटना आहे. मुलीने लग्नास नकार दिल्याने प्रियकर संतापला आणि त्याने हे कृत्य केले. मुलगी आता हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

चंदन नावाच्या तरुणाला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचे होते, मात्र तरुणीने नकार दिल्याने त्याने एकामागून एक १२ वेळा तरुणीवर हल्ला केला. त्यानंतर मुलगी गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडली. यानंतर लोकांनी तिला रुग्णालयात घेऊन गेले जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर मुलगी आणि मुलाच्या कुटुंबात तणावाचे वातावरण होते.

घटनेच्या दिवशी पीडिता तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार होती. तिच्यासोबत आणखी दोन मैत्रिणी होत्या. या दरम्यान प्रियकर चंदन तेथे पोहोचला आणि लग्नासाठी हट्ट करू लागला. मुलीने नकार दिल्याने त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या घटने नंतर आरोपी चंदन संपूर्ण कुटुंबासह घर सोडून पळून गेला. त्याच्या अटकेसाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. आरोपीने तरुणीच्या छातीवर, पोटावर आणि पायावर चाकूने वार केले आहेत.

चार वर्षांपासून प्रेमप्रकरण होते सुरू

आरोपी तरुण आणि तरुणीमध्ये चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. वर्षभरापूर्वी पीडितेच्या नातेवाइकांना याची माहिती मिळाल्यावर हे प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले, त्यानंतर पंचायतीने दोघांना वेगळे करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले तर तरुणाने वारंवार तिला भेटण्याचा व बोलण्याचा प्रयत्न केला. मुलीने ऐकले नाही तेव्हा त्याने मुलीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र स्थानिक पातळीवर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला.

स्थानिक पातळीवर हे प्रकरण तात्पुरतं निवळलं मात्र चंदनच्या मनात तिच्याबद्दल प्रेमाचे भावना अधिक तीव्र झाली. त्यानंतर त्याने थेट तिला गाठलं आणि लग्नाची मागणी केली मात्र तिने नकार दिल्यानंतर हा संपूर्ण घटनाक्रम घडला. सध्या पोलीस चंदनचा शोध घेत असून बरोबरच त्याच्या कुटुंबाचाही शोध घेत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा