राहुरी १७ जून २०२३: राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील ८ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांना, २० जुलै २०२२ रोजी शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिलेली. शासनाच्या या स्थगिती निर्णयाविरोधात १२ ऑक्टोबर २०२२ रोजी, ग्रामस्थांच्या आग्रहनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली होती. न्यायालयाने स्थगिती उठवल्याने, आता स्थगिती दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती, माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ३९ विविध विकास कामांसाठी, सुमारे २५ कोटी रुपयांची मंजुरी व कार्यारंभ आदेश मिळाले होते. परंतु राज्यात अचानक सत्ता बदल झाल्याने विदयमान सरकारने २० जुलै २०२२ रोजी कामांना स्थगिती दिली.
सरकारच्या या स्थगिती निर्णयाविरोधात आ. तनपुरे व ग्रामस्थांनी, औरंगाबाद खंडपीठात १२ ऑक्टोबर २०२२ रोजी याचिका दाखल केलेली. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देत शिंदे-फडणवीस सरकारला चपराक दिली आहे. मध्यंतरी आमदार तनपुरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची मुंबई येथे भेट घेऊन, या कामास त्वरित चालना द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर