यूपीमध्ये निवडणूक प्रचारासाठी आलेल्या असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार

यूपी, ४ फेब्रुवारी 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर तीन-चार राऊंड गोळीबार करण्यात आला. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून वाहनावर गोळीबार केल्याचा दावा केलाय.

ओवेसी यांनी ट्विट केलं की, ‘काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. 4 राऊंड गोळीबार करण्यात आला. तेथे 3-4 जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.’

ओवेसी यांच्या गाडीवर गोळी झाडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. अतिरिक्त एसपी हापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील रहिवासी असलेल्या सचिनने त्याच्या साथीदारासह गोळीबार केला होता. ताब्यात घेतलेल्या सचिनकडून 9 एमएमचे पिस्तूल जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सूत्रांचं म्हणणं आहे की ओवेसी यांच्या वक्तव्यामुळं सचिन संतापला होता, त्यामुळं त्यानं हे पाऊल उचललं.

पोलीस सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात गुंतले आहेत

आयजी मेरठ म्हणतात, पिलखुवा प्लाझा येथे गोळीबार झाल्याची चर्चा आहे, आम्ही सीसीटीव्ही पाहत आहोत. या मार्गावरून ओवेसींचा ताफा जात होता, काही लोकांमध्ये आपसात वादावादी झाली, इतकी माहिती मिळाली. सध्या कोणीही जखमी झालेलं नाही.

या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी

ताफ्यावर गोळीबार केल्यानंतर ओवेसी म्हणाले की, आम्ही मोदी सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही सांगत आहोत की या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी त्यांची आहे. एका खासदारावर 4 राऊंड गोळीबार झाले हे कसं असू शकतं, काही वेळापूर्वी अतिरिक्त एसपींशी बोलणं झालं होतं, त्यांनी सांगितलं होतं की, एका व्यक्तीला पकडलं आहे, शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती करतो. त्याचवेळी हापूरचे एसपी दीपक भुकर यांनी सांगितलं की, असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं आणि एका संशयिताला ताब्यात घेतलं. शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत. त्याचा एक साथीदार पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.

यूपीच्या लढाईत उतरले ओवेसी

उल्लेखनीय आहे की, हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष यूपीमध्ये भागीदारी परिवर्तन मोर्चासोबत एकत्र निवडणूक लढवत आहे. ओवेसी स्वतः आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरले आहेत.

7 टप्प्यात निवडणुका होणार

उत्तर प्रदेशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकात यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी, दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी, तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी, चौथा टप्पा 23 फेब्रुवारी, पाचवा टप्पा 27 फेब्रुवारी, सहावा टप्पा 3 मार्च आणि सातव्या टप्प्यासाठी 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचवेळी 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा