आसाराम खेंडके यांचे नगरसेवक पद रद्द

श्रीगोंदा, १३ आॅक्टोबर २०२०: दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजी मंडई प्रभाग क्रमांक ६ मधून ७६ मतांनी निवडून आलेले आसाराम उर्फ अशोक गुलाब खेंडके यांचे नगरसेवक पद नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ४४(१)(ई) नुसार अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरविले आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधून सर्वसाधारण जागेसाठी अशोक खेंडके (भाजपा) आणि अख्तर शेख (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यामध्ये अख्तर शेख यांचा ७६ मतांनी पराभव झाला. भाजपने अशोक खेंडके यांना एक वर्षे उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. एक वर्षाने दिनांक ९ जून २०२० रोजी खेंडके यांचा भाजपाने राजीनामा घेतला.

उपनगराध्यक्ष झाल्यानंतर अशोक खेंडके यांनी श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक २१८८(३)(अ) मध्ये नगरपालिकेची परवानगी न घेता. तसेच, ती जागा बिगर शेती न करता तेथेच शेड उभारून ट्रॅक्टर वर टेलरचे वर्कशॉप सुरू केले होते. त्यासाठी वीज देखील अनधिकृतपणे घेतली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याच्या कडेला हे क्षेत्र असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पथकिनारवर्ती नियमांचेही उल्लंघन त्यांनी केले होते. म्हणून, त्यांच्या प्रभागातील पराभूत उमेदवार अख्तर शेख यांनी जून २०२० मध्ये आसाराम खेंडके यांचे विरोधात नगर विकास राज्यमंत्री यांच्याकडे नगरपालिका अधिनियम ४४(१)(ई) प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र ठरवून नंतर शासनाने कलम ४२(४) प्रमाणे पाच वर्षे अपात्र करण्याची मागणी केली होती. नगर विकास राज्यमंत्री श्री. प्राजक्त तनपुरे यांनी कलम ४४(१)(ई) प्रमाणे कार्यवाहीसाठी हे प्रकरण अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले होते.

त्यावर दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सुनावणी झाली. अत्तर शेख यांच्या बाजूने ॲड. मदन फडणीस यांनी बाजू मांडली. जिल्हाधिकारी यांनी दिनांक १२ ऑक्टोबर २०२० रोजी खेंडके यांना अपात्र ठरविण्याचा आदेश काढला व त्याची एक प्रत नगर विकास खात्याला पाठवलेली आहे. त्यावरून ते कलम ४२(४) ची कारवाई करून पुढील पाच वर्षे खेंडके यांना अपात्र ठरवू शकतात. खेंडके यांच्यासारखेच अनधिकृत प्रकार आणखी काही नगरसेवकांनी केलेले आहेत. त्यांच्यावरही खेंडके यांच्याप्रमाणे कार्यवाही होऊ शकते. खेंडके यांच्या अपात्रतेच्या निमित्ताने भाजपच्या नगरसेवकांची गळती मात्र सुरू झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा