नाशिक : (२४ एप्रिल २०२०)
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सरासरी ८ पटीने वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
आज (ता. २४, शुक्रवार) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावाचे ६ जण कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. हे सर्वजण मालेगावाच्या संगमेश्वर येथील असून सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. सद्य परिस्थितीत नाशिक जिल्ह्यात एकूण १३० जण कोरोना बाधित असून त्यापैकी ११६ रुग्ण हे केवळ मालेगाव मधील आहेत. यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे.
मालेगाव हे उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे इत्यादी ठिकाणी जे रुग्ण आढळून आले आहेत त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री ही मालेगावाशी संबंधित आढळून आली आहे.
गुरुवारी (ता. २३ एप्रिल २०२०) रोजी सायंकाळी ९ वाजता, कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त अहवालात मालेगाव महानगरपालिकेच्या एका आरोग्य अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. संबधित अधिकारी, सामान्य रुग्णालयात कोरोना विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोरोना संशयित रुग्णांच्या वारंवार संपर्कात येत असल्याने अखेर या अधिकाऱ्याचा अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे बोलले जात आहे.
मालेगावमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला असला तरीही शहराच्या बहुतांश भागात अजूनही नागरिक कोरोनाबाबत पाहिजे तेवढी सतर्कता बाळगत नसल्याचे चित्र समोर येत आहे. इथले नागरिक निर्धास्तपणे शासकीय नियमांचे उल्लंघन करत जमाव करून पोलिसांवरच हल्ले करत आहेत.
मालेगावमध्ये सुरु झालेला कोरोना बधितांचा आकडा अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे, जिल्हा, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला मालेगावच्या नागरिकांनी केराची टोपली दाखवली की काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.