आषाढी पालखी सोहळा रद्द झाल्याने निवृत्तीनाथांच्या पादुका यंदा जाणार बसने

नाशिक, दि.३० मे २०२०: जुलै महिन्यात येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी स्थानापासून नाथांच्या पादुका घेऊन पायी वारी पंढरपूरला निघत असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वाजत गाजत निघणारी पायी वारी रद्द करण्यात आली आहे.

आषाढी एकादशीच्या साधारण २६ दिवस आधी या नाथांच्या पादुका हजारो वारकऱ्यांच्या सोबत टाळ मृदुंगाच्या गजरात नाचत, भजने म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी पंढरपूरला जात असतात.

मात्र, यंदा कोरोनाच्या सावटाखाली ही वारी असून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांनच्या वतीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना पत्रव्यवहार करून आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीला बसमधून या पादुका घेऊन जाण्यासाठी विनंती केली आहे.

या नाथांच्या पादुका घेऊन जाण्यासाठी वीस लोकांची मागणी करण्यात आली असून यात मंदिर विश्वस्त, पायी वारीच्या पालखीचे तीन मानकरी तथा समाधीचे पुजारी जयंत महाराज गोसावी, बेलापूरकर महाराज, डावरे महाराज आणि वारकऱ्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

अद्याप याबाबत निर्णय झाला नसला तरीही यावर लवकरात लवकर मार्ग निघणार आहे. एकूणच त्रंबकेश्वरहुन वीस हजार वारकरी घेऊन जाणाऱ्या या पायी वारीत पंढरपूरपर्यंत जातांना लाखो वारकरी सामील होतात. यासाठी किमान सव्वीस दिवस लागतात. मात्र यंदा या पादुका बसमध्ये जाणार असल्याने एका दिवसात या नाथांच्या पादुका पंढरपुरात दाखल होणार आहे.

यंदा पायी वारी चुकणार असल्याने अनेक वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांच्यासह प्रत्येक वारी न चुकता पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा