Ashadhi Wari 2025 police security in Pimpri-Chinchwad: लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा मान राखत, श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्ताची जय्यत तयारी केली आहे. जवळपास ३५०० पोलीस कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व फौजफाटा वारी सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी सज्ज झाला आहे.
बुधवारी (१८ जून) देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून, गुरुवारी (१९ जून) आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पांडुरंगाच्या भेटीला निघणार आहे. या दोन्ही पालख्यांच्या मार्गावर, विशेषतः देहू आणि आळंदी गावात, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था, पार्किंगचे नियोजन, गर्दी नियंत्रण आणि सर्वसामान्य भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.
या बंदोबस्तात एक पोलीस सहआयुक्त, एक अपर आयुक्त, सहा उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, ६१ निरीक्षक, १७२ उपनिरीक्षक, तब्बल २६३४ अंमलदार आणि ८०० होमगार्ड यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, तीन एसआरपीएफ कंपन्या, चार बॉम्ब शोधक आणि नाशक पथके (BDDS), तीन रॅपिड कंट्रोल पथके आणि १२ स्ट्रायकिंग फोर्स वारीदरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असतील. मंगळवारीच देहू येथे पोलिसांना बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे नियोजनाची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे.

वारीतील गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमार, सोनसाखळी चोर आणि इतर गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे. परराज्यातील आणि परजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली असून, राज्यभरातील पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कठोर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी गर्दीत साध्या वेशातील आणि खुद्द वारकऱ्यांच्या वेशातील पोलीसही सहभागी होणार आहेत. याशिवाय, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सततची नजर आणि पालखी मार्गावर ठिकठिकाणी उभारलेल्या टेहळणी मनोऱ्यांवरून संपूर्ण सोहळ्यावर बारीक लक्ष ठेवले जाईल.
या सर्व उपाययोजनांमुळे वारी अत्यंत सुरक्षित आणि उत्साहात पार पडेल असा विश्वास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे













































