पंढरपूर, दि.६ जून २०२०: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून काही वारकरी भाविक पंढरपुरात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने खबरदारी म्हणून पंढरपूर व परिसरातील जवळपास चारशेहून अधिक मठ पुढचे दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेने सर्व मठांच्या व्यवस्थापकांना तशा लेखी नोटीसा दिल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग, शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करणे, शहरातील स्वच्छता राखणे, व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना सोशल डिस्टन्सींग विषयी माहिती देणे आदींचा समावेश आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करुनही शहरात कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. त्यानंतर बाधीत भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
अशातच निर्जला एकादशीच्या दिवशी राज्याच्या अनेक भागातून काही वारकरी पंढरपुरात आले होते. ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने संबंधीत वारकऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
न्युज अनकट प्रतिनिधी: